स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे कोलते यांची मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे मागणी
जालना । वार्ताहर
कोविड-19 च्या जागतीक महामारीचा सामना आपण गेली सहा महिने करित आहोत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य तसेच जिल्हा स्तरावरील कोणतीही शासकीय पद भरती करु नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील बेरोजगारांवर अन्याय होवु नये, त्यांचे भवितव्य धोक्यात येवु नये या दृष्टीने शासन सेवा प्रवेशाची वयोमर्यादा दोन वर्षाने वाढवीण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्यपाल भगतसिंहजी कोशारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री व राज्यपाल यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रासह देशात कोविड-19 चा सामना करतांना राज्याची आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणावरुन राज्यस्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील शासकीय पद भरती करण्यात येवु नये असा शासन निर्णय वित्त विभागाने निर्गमीत केला आहे. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपत आली आहे. त्यांना यावर्षी पद भरती प्रक्रियेत सामिल होता येणार नसल्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सन 2020 यावर्षी पद भरती झाली असती तर काही उमेद्वारांची निवड निश्चितपणे झाली असती व त्यांना शासकीय सेवेची संधी मिळाली असती. अशा पध्दतीने बेरोजगारांचे आयुष्यभराचे नुकसान होवु नये, त्यांचे भवितव्य धोक्यात येवु नये या दृष्टीने शासकीय सेवेसाठीची वयोमर्यादा दोन वर्षाने वाढविण्याची आवश्यकता आहे. दि. 25 एप्रिल 2016 रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विविध मंत्रालयीन विभागांनी तसेच विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवड समित्या, विभाग स्तरावरील निवड समित्या व जिल्हास्तरीय निवड समित्या यांच्या मार्ङ्गत घेण्यात येणा-या विविध पदांसाठीच्या स्पर्धा परिक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे करण्यात आली आहे. आता कोरोना काळात संपुर्ण 2020 हे वर्ष पुर्णपणे वाया गेल्यामुळे ही वयोमर्यादा खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोन वर्षाकरीता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे करीता, पुढील दोन वर्षासाठी नौकरी विषयक शासन सेवा प्रवेशासाठी वयोमर्यादा दोन वर्षानी वाढविण्याची मागणी बाबासाहेब कोलते यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment