जालना । वार्ताहर
वैद्यकीय प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेला 70=30 हा कोटा तात्काळ रद्द करून उद्या विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आ.श्री कैलास गोरंटयाल यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी शासनाने 70=30 चा कोटा निश्चित करून या पद्धतीने प्रवेश दिला जायचा.ही पध्दत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याने सदर प्रवेश पध्दतीत बदल करावा अशी मागणी राज्यभरातील विद्यार्थ्यांसह पालकांमधून केली जात होती.मराठवाडा विभागातील आमदार सर्वश्री कैलास गोरंटयाल यांच्यासह आ.सुरेश वरपूडकर,आ.मेघना बोर्डीकर, आ.राहुल पाटील,तसेच आ.अमित झनक आदी 10 ते 12 आमदारांनी याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार,उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान भेट घेऊन वैद्यकीय प्रवेशासाठी असलेली उपरोक्त पध्दत तात्काळ बंद करून वैद्यकीय प्रवेश हे गुणवत्तेनुसार देण्याची आग्रही मागणी यावेळी केली.
या मागणीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती यांच्या दालनात आज दि.7 सप्टेंबर सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री पवार,उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री देशमुख, राज्यमंत्री ूरवीर्रींज्ञरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. या मिटिंग मध्ये आ.कैलास गोरंटयाल यांच्यासह उपस्थित सर्वच आमदारांनी वैद्यकीय प्रवेशासाठी असलेला 70=30 चा कोटा पध्दत तात्काळ रद्द करण्याची आग्रही भूमिका उपमुख्यमंत्री श्री पवार आणि मंत्री श्री देशमुख यांच्या समोर मांडली. या पध्दतीमुळे वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र असणार्या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. शिवाय नीट ची परीक्षा आता सर्वत्र सारखी असणार असल्यामुळे याबाबत राज्य शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे आ.गोरंटयाल यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि उच्च वैद्यकीय मंत्री श्री अमितजी देशमुख यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन या बाबत विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात म्हणजे उद्या मंगळवारी सभागृहात ठोस निर्णय घेण्यात येईल व त्या बाबतची घोषणा संबधीत विभागाचे मंत्री करतील असे आश्वासन उपस्थित आमदारांना दिल्याचे आ.गोरंटयाल यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयामुळे गुणवत्ता धारक आणि पात्र विद्यार्थ्यांवर वैद्यकीय प्रवेशात होत असलेला अन्याय दूर होईल असा विश्वास आ.गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.
Leave a comment