भोकरदन । वार्ताहर
भोकरदन शहरातील नागरिक नागरी समस्येने ग्रासले असून नगर परिषद प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यातच महिनाभरापासून पालिकेला मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांची कामे थांबलेली आहे. पालिकेने तात्काळ सर्व समस्या सोडवण्याचे निवेदन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात धुरफवारणी तसेच सॅनिटायझर फवारणी झालेली नाही.
शहरात डासांचे प्रमाणही वाढले असून अनेक भागात नाल्याचे कढडे फुटल्याने रस्त्यावरून गटारीचे पाणी वाहत आहे. यामुळे रोगराई वाढत आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य वाढले आहे, त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. शहरातील पाणी पुरवठा देखील गेल्या काही महीन्यांपासून सुरळीत नाही, श्रावण महिन्यातील सर्व सण तसेच गणेशोत्सव व मुस्लिमांच्या रमजान महिन्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. काही भागात नळाला पाणी आले की लोड शेडिंग सुरू होत असल्याने या भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील लाईट तसेच काही चौकातील हायमास्ट लाईट बंद पडल्याने अंधाराला सामोरे जावे लागत आहे. गावात कुठूनतरी मोठ्या संख्येने भटके कुत्रे आणून सोडण्यात आले असून मुख्य रस्त्यावर तसेच गावात या कुत्र्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. शहरातील स्मशानभूमीत देखील अंधार असून स्मशानभूमीच्या शेडची ची दुरवस्था झाली असून मोडकळीस आलेली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून अंत्यसंस्कार साठी आलेल्या नागरिकांना बसायला जागा राहिली नाही. या सर्व समस्यांवर नगर परिषद ने तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष मुकेश चिने, पंढरीनाथ खरात ,सतीश बापू रोकडे , दीपक जाधव , दीपक मोरे , भगवान बोर्डे , जगदीश कामगार, संदीप बरडे , नजीर शहा , हर्षल शास्त्री , अर्जुन रामफळे , ज्ञानेश्वर तळेकर आदी उपस्थित होते.
Leave a comment