जालना । वार्ताहर
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी विविध दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. सदरच्या वाहतूक दरम्यान अवैध गौण खनिजाचे उत्खणन व वाहतूक करीत असतांना वाहने जप्त करण्यात येऊन संबधित कार्यालयाच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या वाहनाची दंड रक्कम न भरलेल्या एकूण 97 वाहनांचा लिलाव होणार असल्यचे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
शासन अधिसूचना 12 जानेवारी 2018 अन्वये गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करित असतांना जप्त केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन दंडाची रक्कम वसूल करण्याची तरतूद असून जप्त करण्यात आलेल्या वाहनाबाबत वाहन मालकानां दंड रक्कम भरणा करणेबाबत कळविल्यानंतर विहित मुदतीत रक्कमेचा भरणा संबधितांनी करणे आवश्यक होते. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांचे कार्यालयामध्ये गौण खनिजाची अवैध उत्खनन व वाहतुक करीत असतांना बर्याच कालावधीपासूनची वाहने जप्त करण्यात आलेली असून या वाहन मालकास दंड भरण्यासाठी कळविले असतांना देखील त्यांच्याकडून कुठल्याही स्वरुपाचा प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मुल्यांकन मागविण्यात आलेले असून हे मुल्यांकन आधारे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमातील तरतुदींचा विचार करुन जप्त वाहनाचा लिलाव करण्याची कार्यवाही उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. वाहनाच्या लिलावातून प्राप्त होणारी रक्कम दंडात जमा करण्यात येणार आहे. संबधित वाहन मालकांनी संबधित कायार्लयाशी संपर्क साधून तातडीने रक्कमेचा भरणा करावा नसता वाहनांचा लिलावा करण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Leave a comment