बीड । वार्ताहर

कोरोना संसर्गामध्ये सर्व काही नविन शिकायला मिळाले, त्यामध्ये सोशल डिस्टन्स आणि मास्क या दोन गोष्टींचा थेट प्रत्येकाशी संबंध आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापार अनिवार्य केल्यानंतर बाजारपेठेमध्ये मास्कचा बाजार भरला. खरे तर जुन्या काळात प्रत्येकजण तोंडावर रूमाल टाकुन विशेषत: कामगार महिला तोंडावर साडीचा पदर घेवून काम करत असत. आता कोरोनामुळे प्रत्येकालाच तोंड आणि नाक झाकुन चालण्याची वेळ आली आहे. मास्कचा वापर अनिवार्य झाला आहे. बाजारामध्ये   वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे मास्क सध्या उपलब्ध आहेत पण नेमका कोणता मास्क वापरावा? मास्क वापरताना नाक, तोंड आणि हनुवटी झाकणारा साध्या कॉटन कपड्याचा तीन पडद्याचा मास्कर वापरणे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे हाच मास्क वापरणे फायद्याचे आहे. 

बाजारपेठेत सध्या मास्कचा बाजार भरलाय. कापडी, सर्जिकल, एन-95, एफएफपी थ्री असे अनेक मास्क बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मास्क कुठला वापरावा, हा प्रश्‍न सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत.

सर्वसामान्यांसाठी कापडी मास्क चांगला

सर्वसामान्य जनतेने सर्जिकल मास्क आणि एन-95 मास्क वापरण्याची काही विशेष आवश्यकता नाही. जागतिक आरोग्य संघटनेने पाच जून 2020 रोजी मास्कच्या वापरासंदर्भात अंतरिम मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार सर्वसामान्य जनतेने बाहेर पडताना फॅब्रिक मास्कचा वापर करावा. हे फॅब्रिक मास्क (म्हणजे कापडी मास्क) तीनपदरी असावे. या तीन पदरातील आतला पदर हा हायड्रोफिलिक कपड्यांपासून बनलेला असावा. उदाहरणार्थ, सुती कपड्यापासून बनलेला असावा. एकदम बाहेरचा लेअर हा हायड्रोफोबिक कपड्यापासून बनलेला असावा. हायड्रोफोबिक कपडा म्हणजे पॉलिएस्टर किंवा पॉलीप्रोपिलीन किंवा या दोघांच्या मिश्रणातून बनलेला. तर मधला लेअर हा सिंथेटिक नॉन वोव्हन कपडा म्हणजे पॉलीप्रोपिलीन किंवा कॉटन लेयरपासून बनलेला असावा, जेणेकरून फिल्ट्रेशन चांगले होईल किंवा ड्रॉपलेट या मधल्या लेअर मध्येच रोखले जातील. जागतिक आरोग्य संघटनेच्या या सूचना समूह संसर्ग सुरू झालेल्या देशांसाठी आहेत. भारत जरी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जगात चौथ्या स्थानावर असला तरी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अजूनही भारत स्टेज ’टू’ मध्येच आहे! परंतु नजीकच्या भविष्यात जर भारत ’स्टेज थ्री’ मध्ये पोचला तर या सर्व मार्गदर्शक सूचना आपल्याला देखील लागू होतील. 

श्‍वास घेण्यास त्रास होत नाही

मास्कच्या सतत वापरामुळे हायपॉक्सिया होतो, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो किंवा श्‍वासोश्‍वास घेण्यास त्रास होतो असा गैरसमज आहे. मात्र मास्कमुळे असे काहीही होत नाही, बाहेर काम असेपर्यंत मास्क लावणे सर्वांसाठीच चांगले आहे.

मास्क मोठा असावा 

रंगीबेरंगी, विविध आकारांचे मास्क बाजारात आहेत; परंतु शक्यतो तीनपदरी मास्क वापरा आणि मास्क हा मोठा असावा, जो की नाक, तोंड आणि हनुवटी पूर्ण झाकू शकेल. मास्क तयार करताना घ्यावयाचा कपडा हा शक्यतो 25 सेंटिमीटर लांब आणि 15 सेंटिमीटर रुंद एवढा मोठा असावा. त्यामुळे स्वस्तात मिळणारे चार इंची मास्क वापरण्यापेक्षा मोठा मास्क वापरणे श्रेयस्कर. खराब झालेला, ओला, छिद्रे असलेला, फाटलेला मास्कदेखील वापरू नये. 

विनाकारण हात लावू नका 

बर्‍याच लोकांना सवय असते, की ओळखीची कोणी व्यक्ती भेटला तर मास्क तोंडावरून खाली घेतात आणि गळ्यात अडकवतात आणि बोलायला लागतात. असे करणे टाळा. एकदा घराच्या बाहेर पडलं, की तुम्ही घातलेला मास्क हा घरी परतल्यानंतरच काढायचा हे लक्षात घ्या. 

काढताना ही घ्या काळजी 

हात साबणाने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करून मगच मास्क चेहर्‍यावर घाला. काढताना मास्कच्या पुढील बाजूस स्पर्श न करता केवळ कानाच्या बाजूला असणार्‍या दोरीला अथवा इलॅस्टिक पकडून काढा आणि लगेच धुवायला टाका. नंतर आपले हात स्वच्छ साबणाने अथवा सॅनिटायझरने धुऊन घ्या; तसेच मास्क शर्टच्या किंवा पँटच्या खिशामध्ये ठेवू नका. 

 

 

दुचाकीस्वारांचे मास्कला प्राधान्य, पण हेल्मेटकडे दुर्लक्ष

कोरोनामुळे देशात हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे हात धुणे, मास्कचा वापर सर्व जण करत आहेत. मास्कची सवय आपण लवकर स्वीकारली, पण हेल्मेट न घातल्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना अद्यापही दुचाकीस्वार हेल्मेटकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येत आहे.

लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरू होती. मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर अनेक चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. मास्क घालण्याबाबत फार कारवाई न करताही, लोक सर्रास मास्क वापरतात. कोरोनामुळे आपण मास्क तर घालायला लागलो, पण ज्या देशात 1.5 लाख लोक रस्ते अपघातामुळे मरतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार? याकडेही वाहनचालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.