पुण्यातील व्यक्तीला गावात प्रवेश
बीड । वार्ताहर
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या दरम्यान बाहेरगावहून येणार्या व्यक्तींना गावात प्रवेश न देता त्यांच्या राहण्याची सोय लोकवस्तीपासून दुरच्या शेतात करण्याचे आदेश सीईओ अजित कुंभार यांनी दिलेले आहेत. मात्र असे असतानाही परळी तालुक्यातील मौजे कौडगाव (हुडा) व जयगाव येथे पुण्यातील दोन व्यक्ती गावात आल्याचे निष्पन्न झाल्यावरून या दोन्ही गावच्या सरपंचांना सिरसाळा पोलीस निरीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
जयगावच्या सरपंच इंदुबाई नायबळ व कौडगाव(हुडा) चे सरंपच सुभाष राठोड यांना सोमवारी (दि. 27) या नोटीस सिरसाळा पोलीसांनी जारी केल्या आहेत. जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांच्या पत्रानुसार गावात येणार्या व्यक्तीची गावाबाहेर शेतात किंवा ईतर ठिकाणी व्यवस्था करण्याचे आदेश आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागु केलेली आहे. असे असतानाही आपण पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश दिला व त्याला गावात राहण्यास कोणताही प्रतिबंध केला नाही, शिवाय त्याबाबतची माहिती पोलीसांना कळवली नाही त्यामुळे आपण कर्तव्यात अत्यंत निष्काळजीपणाचे व बेजबाबदारपणाचे वर्तन केले आहे. त्यासाठी आपल्या विरूद्ध गुन्हा का दाखल करण्यात येवु नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस या दोन्ही सरपंचांना जारी करण्यात आली असून तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
Leave a comment