सोलापूर । वार्ताहर
सोलापूरचे जेष्ठ पत्रकार स्वर्गीय अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
गेल्या महिन्यात गुढीपाडव्यादिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळेसपासून त्या सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र आज पावणेबारा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तसेच मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत. असा परिवार आहे.
अपर्णा रामतीर्थकर यांनी मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001 पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008 पासून ‘चला नाती जपू या’,‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.
Leave a comment