मुंबई । वार्ताहर
देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना चिंता वाढविणारी बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६८ हजार ६०७ कोटी रुपयांचे कर्ज निर्लेखित (बुडीत खाती) केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारामधून समोर आले आहे. यामध्ये विदेशातून पळून गेलेल्या मेहुल चोक्सीसह देशातील सर्वात मोठ्या ५० कर्जबुडव्यांचा समावेश आहे.
आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारात अर्ज करून देशातील सर्वात मोठ्या कर्जबुडव्यांची माहिती आणि १६ फेब्रुवारीपर्यंतच्या कर्जाची स्थिती मागविली होती. याबाबत माहिती देताना गोखले म्हणाले, की काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली नाही. त्यामुळे आरबीआयकडून माहिती अधिकारातून माहिती मागविली. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे जनसंपर्क अधिकारी अभय कुमार यांनी २४ एप्रिलला माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
आरबीआयने दिलेल्या उत्तरात ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे ६८ हजार ६०७ कोटी रुपयांचे कर्ज हे निर्लेखित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये विदेशातून कर्ज घेतलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास आरबीआयने नकार दिला. त्यासाठी आरबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील एक दाखला दिला.
चोक्सीने घोटाळे केलेल्या कंपनीचे ५ हजार ४९२ कोटींचे कर्ज निर्लेखित केले आहे. बहुतेक कर्जबुडव्यांनी सरकारी बँकांचे कर्ज बुडवले आहे. त्यामधील काहीजण विदेशात पळून गेले आहेत. तर काहीजण देशात आहेत. बहुतेक सर्वांची सरकारी संस्थांकडून चौकशी सुरू असल्याचे आरटीआय कार्यकर्ते गोखले यांनी सांगितले.
चोक्सी हा सध्या अँटिगा आणि बाबार्डोस इस्लेस देशाचा नागरिक आहे. तर त्याचा भाचा नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे. निर्लेखित कर्जामध्ये बाबा रामदेव आणि बाळकृष्ण ग्रुप कंपनीची रुची सोया कंपनीच्या २ हजार २१२ कोटीच्या कर्जाचा समावेश आहे. निर्लेखितचा (राईट ऑफ) वापर करून बँका त्यांचा ताळेबंद स्वच्छ करतात. यामध्ये बँका बुडित कर्जाचा विचार करतात.
Leave a comment