बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 189 जणांच्या थ्रोट स्वॅबचे नमुने कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. दरम्यान आज सोमवारी (दि.27) सकाळी बीडमधून 1 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 2 असे एकुण 3 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
सध्या बीड जिल्हा कोरोनामुक्त आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून वारंवार केले जात आहे. आज सोमवारी तीन जणांच्या थ्रोट स्वॅबचे रिपोर्ट सायंकाळपर्यंत प्राप्त होणार आहेत. दुसरीकडे आष्टी तालुक्यातील रुग्ण कोरोनामुक्त होवून गावी परतला आहे. सोमवारी बीड शहरात एक दिवसाआड अडीच तासांसाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती. या दरम्यान नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करु नये व आपल्या घराजवळच भाजीपाल्याची खरेदी करावी यासाठी शहरातील जालना रोडसह अन्य भागात बॅरिकेंटिग करुन रस्ते बंद करण्यात आले होते.
Leave a comment