हिंगोली । वार्ताहर
बंदोबस्तावरुन परतलेल्या हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस दलातील सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आता पुन्हा चार जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आज सोमवारी (दि.27) तपासणी अहवालात पुढे आले आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील अधिकारी व जवान मालेगाव येथून तर काही जवान मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये परतले होते. या 191 अधिकारी व जवानां पैकी सहा जणांना कोरोणाची लागण झाल्याचे 21 एप्रिल रोजी स्पष्ट झाले आहे. त्यानंतर उर्वरित सर्व जवानांना राज्य राखीव पोलीस दला अंतर्गत तयार करण्यात आलेल्या क्वाँरटाईन सेंटर मध्ये भरती करण्यात आले होते. यातील चारही जवानांचा पहिला कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. यापैकी तीन जणांना ताप सर्दी खोकला असल्यामुळे 23 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते तर एका जवानाला 24 एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. या सर्व चारही जवानांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी 25 एप्रिल रोजी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. तो अहवाल आज प्राप्त झाला असून या चारही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 11 वर जाऊन पोहचली आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास व वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
Leave a comment