मुंबई । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर या काळात रेल्वे, विमान सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सेवा नेमक्या कधी सुरु होणार? याबद्दलही चर्चा सुरु होती. त्यात नुकतेच एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीने ४ मेपासून देशांतर्गत तर १ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचं बुकिंग सुरू करण्यासंदर्भात त्यांच्या वेबसाईटवर घोषणा केली. मात्र, देशातल्या इतर खासगी विमान कंपन्यांनी कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. त्यामुळे, नियमित विमान प्रवास करणाऱ्यांसाठी हा एक चर्चेचा विषय ठरला होता. त्यातच, वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपल्या घरी परतीचे वेध लागले होते. रेल्वे लवकर सुरू होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर किमान विमानाने तरी प्रवास करता येईल, या आशेवर हे प्रवासी होते. अखेर, आता भारताच्या खासगी विमान कंपन्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रवासासाठी बुकिंग घेणे पुन्हा शनिवारपासून सुरू केले आहे. स्पाइसजेट आणि गोएअरने १६ मे पासून उड्डाणासह बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इंडिगो आणि विस्तारा १ जून पासून हवाई वाहतूक सुरू करणार आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील विमान सेवा बंद करण्याचे आदेश जारी केले होते. विमान सेवांची तिकीट बुकिंग सुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र काही खासगी कंपन्यांनी ही तिकीट बुकिंग पुन्हा सुरू केली असून नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अद्याप यासंदर्भात कोणत्याही सूचना नसल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विमान तळावरून बंगळुरूला जाण्याकरता १६ मे २०२० पासून स्पाइसजेट विमानाचे प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या तिकिटांची किमंत ३ हजार ५०० पासून सुरु आहे. त्याचप्रमाणे इंडिगोच्या विमानाचे तिकीटसुद्धा बुकिंगसाठी उपलब्ध होणार असून १ जून २०२० पासून या विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे.
Leave a comment