बीड । वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात शुक्रवारी दाखल झालेल्या एकूण सहा जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. पैकी एकाचा रिपोर्ट शनिवारी (दि.25) सायंकाळी प्राप्त झाला, तो निगेटिव्ह आला तर उर्वरित 5 जणांचे अहवालही रात्री उशिरा प्राप्त झाले ते रिपोर्टही निगेटिव्ह आले. तर रविवारी (दि.26) पाठवलेले अन्य 3 असे एकुण 9 रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.त्यामुळे सद्यस्थितीत बीड जिल्ह कोरोनामुक्त आहे.
शुक्रवारी सहा जण विलगीकरण कक्षांमध्ये दाखल झाले. ते सर्व जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पैकी गेवराई तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल शनिवारी सायंकाळी बीडच्या आरोग्य विभागास प्राप्त झाला होता तो निगेटिव्ह आल्याने अन्य पाच अहवालांची प्रतीक्षा होती, ती ही रात्री उशिरा संपली, कारण सारे पाचही अहवाल निगेटिव्ह आले. तसेच रविवारी सकाळी पुन्हा अन्य तिघांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, ते सर्व रिपोर्ट सायंकाळी प्राप्त झाले. ते रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात तपासलेले सर्व 189 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 38 इतकी आहे तर 299 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 31 हजार 832 ऊसतोड मजूरांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
Leave a comment