मुंबई । वार्ताहर
मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचार्यांप्रमाणेच अहोरात्र सेवा देणार्या पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील ५७ वर्षीय कोरोनाबाधित कॉन्स्टेबल चंद्रकांत गणपत पेंदुरकर यांचे शनिवारी नायर रुग्णालयात निधन झाले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बाधित झालेल्या पोलिसांपैकी प्रथमच एका आपल्या सहकार्याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.( सदरील फोटो संग्रहित )
राज्यातील ९६ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग
कोरोना व्हायरस समूहात पसरू नये, यासाठी राज्यातले पोलीस दल अहोरात्र बंदोबस्ताची ड्युटी बजावत आहे. मात्र ही ड्युटी निभावत असताना राज्यातील ९६ पोलिसांना लॉकडाऊननंतर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये १५ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती पोलीस खात्याकडून मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त संकेतस्थळावर दिले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की, यापैकी तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस शिपाई कोरोना व्हायरसपासून बरे झाले आहेत. या सात पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत भारतीय दंड विधान कलम १८८ अंतर्गत ६९, ३७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४,९५५ लोकांना अटक करण्यात आलेली आहे.
Leave a comment