जयदत्त क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बीड । वार्ताहर
मराठवाडा विकास महामंडळाला मुदत वाढ देऊन विकासाचा अनुशेष भरून काढावा आणि खरीप हंगामासाठी पीक विमा कँपनीची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी घटनेच्या 371 (2) कलमानुसार मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या महामंडळाची मुदत 30 एप्रिल 2020 रोजी संपत असून अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विकास महामंडळाला मुदतवाढ देणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील व विदर्भातील विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात बाकी असून तो कालबद्ध वेळेत भरून काढण्यासाठी महामंडळाला मुदतवाढ देणे व त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक असून महाराष्ट्रातील बीड सहित 10 जिल्ह्यात गेल्या रब्बी हंगामात शेतकर्यांना पीक विमा भरता आलेला नाही त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. सध्याचे वातावरण पाहता खरीप हंगामासाठी पिक विमा शेतकर्यांना भरता आला पाहिजे. गेल्या रब्बी हंगामात पिक विमा भरण्यासाठी कोणत्याही विमा कँपनीने तयारी दर्शवली नव्हती त्यामुळे आता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी विमा कँपनीची नियुक्ती करावी व यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा पिक विमा शेतकर्यांना योग्यवेळी भरता यावा यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशा मागणीचे पत्र माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. यामुळे विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधीची उपलब्धता होईल आणि आणि शेतकर्यांना पीक विमा भरण्यासाठी कँपनीची नियुक्ती झाल्यास याचा फायदा शेतकर्यांना अधिक होईल.
Leave a comment