पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या मार्फत मराठवाडा हॉटेलवर मोफत जेवणाची सोय
परळी । वार्ताहर
पुण्यातील नारायणपेठ भागात स्पर्धा परीक्षा व विविध शिक्षण घेणारे परळीसह बीड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकलेले आहेत. याबाबत एका फेसबुक पोस्टवरून माहिती मिळताच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या ’नाथ प्रतिष्ठान’ च्या वतीने नारायण पेठ भागातील मराठवाडा हॉटेलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.
मराठवाडा हॉटेलचे चालक अनिलकुमार गित्ते यांना रात्री संपर्क करून ना. मुंडे यांनी या हॉटेलवर सर्व विद्यार्थ्यांची मोफत जेवणाची व्यवस्था करण्याबाबत सूचना देऊन त्यासाठी आवश्यक ती मदत श्री. गित्ते यांना पोहोच केली आहे. कोरोना व्हायरस च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये विशेषकरून पुणे येथे शिकणार्या, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या व लॉक डाऊन मुळे तिथेच अडकून पडलेल्या विद्यार्थी मुला-मुलींचे जेवणाचे हाल होत आहेत. याबाबत परळी तालुक्यातील एका विद्यार्थ्याने फेसबुकवर केलेली पोस्ट ना. मुंडे यांनी पाहिली, त्याबरोबर त्यांनी तात्काळ अनिलकुमार गित्ते यांना संपर्क करून अशा सर्व विद्यार्थ्यांची मोफत जेवणाची सोय करा, त्यासाठी आवश्यक सर्व मदत ’नाथ प्रतिष्ठान’तर्फे करण्यात येईल असे सूचित केले व त्यानुसार प्रत्यक्ष मदतही पोहोच केली. या मराठवाडा हॉटेलमध्ये सध्या 100 मुले-मुली भोजन घेत असून, त्यापैकी जवळपास 60 मुले मुली परळी तालुका व बीड जिल्ह्यातील आहेत. तसेच जवळपासच्या गरजू विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन हॉटेल चालक अनिलकुमार गित्ते यांनी केले आहे. (हॉटेल मराठवाडा, नारायण पेठ पुणे, मो. 9767341444) दरम्यान एका फेसबुक पोस्टवरून रात्रीतून विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करून दिल्याने धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशील व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
Leave a comment