मुंबई। वार्ताहर
मुंबईसह पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढण्याचा विचार सरकार करीत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशातील लॉकडाऊन 3 मे रोजी संपत आहे. मात्र मुंबई-पुणेकरांना 18 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये रहावे लागणार आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही शक्यता वर्तवली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणानेच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण जर प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. झोपडपट्ट्यांमध्ये करोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत, ही सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास 3 मेनंतर मुंबई, पुण्यातील फक्त कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो, असंही ते म्हणाले.
राज्यात सध्या 512 कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या 7 एप्रिलपासून कोंढवा आणि जुन्या पुण्यातील बाजारपेठा बंद आहेत. गेल्या महिन्याभरात मुंबई-पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याचाच अर्थ असा की पुणे आणि मुंबईतील सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावा लागेल. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभांवर 18 मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. 3 मेनंतर मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात कमीत कमी 15 दिवस कुठल्याही बिगर महत्त्वाच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ( सदरील फोटो संग्रहित )
Leave a comment