नवी दिल्ली: केंद्र सरकारने हॉटस्पॉट आणि कंटेनमेट भाग वगळून इतर ठिकाणी सामानाची दुकाने सशर्थ उघडण्याची अनुमती दिल्यानंतर दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये काहीअंशी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने आपल्या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अशी परवानगी देत असताना सलून, न्हाव्याची दुकाने, रेस्टॉरंट्स आणि दारूची दुकाने उघडण्याची परवागी दिलेली नाही. यामुळे सलून, न्हव्याची दुकाने, रेस्टॉरंट्स आणि दारूची दुकाने नेहमीप्रमाणे लॉकडाउनमध्ये बंदच राहतील असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.
वस्ती, सोसायटी आणि रहिवासी भागांमधील स्वतंत्र दुकानांना सूट देत असताना केंद्र सरकारने अटी आणि शर्थीही पु़ढे ठेवल्या आहेत. यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मात्र, केंद्र सरकारच्या दुकाने उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेमकी कोणती दुकाने उघडायची आणि कोणती दुकाने बंद राहतील का याबाबत व्यापारी आणि दुकानदारांमध्ये काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ती दूर व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयला पुन्हा स्पष्टीकरण द्यावे लागले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत १५ एप्रिलला जारी केलेल्या आदेशात केंद्र सरकारने बदल केला. त्यानुसार केंद्र सरकारने जीवनावश्यक नसलेल्या सामानांची दुकाने काही अटी आणि शर्थींवर सुरू करण्याचे परवानगी दिली. त्यानंतर दुकानदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. हे लक्षात आल्यानंतर सरकारने आपल्या आदेशाचे नव्याने स्पष्टीकरण दिले.
Leave a comment