बेड वाढवले; खासगी रुग्णालये होणार अधिगृहीत,व्हेंटिलेटरचीही मागणी
बीड । वार्ताहर
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने आता आणखी वेगवान निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र भविष्यातील नियोजन म्हणून आता जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क केली जात आहे. एकावेळी 4 हजाराहून अधिक रुग्णावर उपचार करता येतील इतक्या बेडची व्यवस्था शिवाय आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटरही काही प्रमाणात उपलब्ध केले जात आहेत. शिवाय शहरांमधील खासगी रुग्णालयाच्या इमारतीही कोरोना उपचारासाठी अधिगृहीत करण्यात येणार आहे. उपचारासाठी जिल्ह्यात दिडशेहून अधिक तज्ञ वैद्यकीय अधिकार्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने सर्व उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात यापुढे गरज भासलीस तर एकावेळी चार हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करता येतील अशी व्यवस्था जिल्हाभरात केली जाणार आहे. दरम्यान कोव्हिड केअर सेंटरमध्ये 2250 असे रुग्ण ठेवले जातील.कोरोनाचे लक्षण नाहीत पण अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यासाठी समाजकल्याण,आयटीआय, खासगी शिक्षण संस्थेचे वसतिगृह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याची क्षमता 2850 रुग्णाची असणार आहे. दुसरा टप्पा कोव्हिड हेल्थ सेंटर, त्यात 750 बेड असणार आहेत. यात लोखंडी सावरगाव येथे 300 बेड, गेवराई उपजिल्हा रुग्णालयात 50, आष्टी येथे 30 बेड, बीड जिल्ह्यात अधिग्रहित केलेल्या सात रुग्णालयात 350 बेड असणार आहेत. तिसरा टप्पा गंभीर रुग्णासाठीचा आहे. त्यासाठी 750 बेड तयार ठेवले आहेत. बीड जिल्हा रुग्णालय अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात प्रत्येकी 250 बेड तर परळी, केज, लोखंडी सावरगाव येथे मिळून 250 बेड आहेत. गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी सेंट्रल ऑक्सिजनची व्यवस्था केली गेली आहे. 150 खासगी तज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या 20 व्हेंटिलेटर तयार आहेत, अजून 30 व्हेंटिलेटरची मागणी आहे, तर खासगी रुग्णालयातील 57 व्हेंटिलेटर ताब्यात घेतले जाणार आहेत. यासोबतच उपचार करणार्या वैद्यकीय अधिकारी,कर्मचार्यांना दररोज 25 पीपीई कीट लागणार आहेत. त्याची व्यवस्था केली जाणार आहे.
डब्ल्युएचओकडून बीडचा आढावा
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.समिर नवाल यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या आयसोलेशन वार्डाची पाहणी केली.या सर्व रुग्णालयाची मांडणी, सुविधा व इतर पाहणी डॉ. नवाल यांनी केले. तसेच काही तांत्रिक अडचणीही समजून घेतल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षाचीही पाहणी केली. यावेळी चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ. सचिन आंधळकर, डॉ.महेश माने, डॉ.जयश्री बांगर, मेट्रन संगिता दिंडकर उपस्थित होते. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस हे प्रतिनिधी बीड जिल्हा दौर्यावर होते.
Leave a comment