प्रशासनाचे आदेश पाळा;तहसीलदार किरण आंबेकर
बीड । वार्ताहर
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्ह्यातील गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने नाम फाउंडेशन पुन्हा एकदा पुढे आले आहे. नाम फाउंडेशन जिल्ह्यातील सहाशे गरजूंना किराणा सामानाचे सहाशे किट वाटप करण्यासाठीचे काम अँड. अजित देशमुख यांच्याकडे सोपंवले आहे. शुक्रवारी या वाटपाच शुभारंभ झाला. बीड तालुक्यातील पेंडगाव आणि घोसापुरी त्याचप्रमाणे पाली आणि पोहीचा देव या ठिकाणी यातील काही कीट वाटप करण्यात आले. पेंडगाव आणि घोसापुरी येथे स्वतः तहसीलदार उपस्थित होते.
तहसीलदार किरण आंबेकर यांनी जनतेने लॉक डाऊन संदर्भातील प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. त्याच प्रमाणे संचार बंदीच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. तर नाम संकटकाळी मदतीला धावून आल्याबद्दल त्यांनी नामचे आभार मानले. रेशन बाबत आपण कठोर भूमिका घेत असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर मकरंद अनासपुरे, राजाभाऊ शेळके यांचे तर्फे जिल्ह्यात किराणा सामानाचे सहाशे किट बीड जिल्ह्यात वाटप होत आहेत.या प्राप्त झालेल्या किटमध्ये तूर डाळ, हरभरा डाळ, पोहे, चहा पुडा, हरभरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, साखर, मीठ आणि गोडेतेल दोन तेल पुडे, इ. जवळपास 12 किलो साहित्य आहे. नाम करीत असलेली ही मदत सेवाभावी वृत्तीची असून नाम यापूर्वी देखील दुष्काळात बीड जिल्ह्यात धाऊन आलेली होती. यापूर्वी नामने जिल्ह्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात चारा पाठवला होता. आणि त्यापूर्वी जिल्ह्यातील गाळ काढण्यासाठी पोकलेन देखील दिले होते. नामची ही मदत संकटकाळी प्राप्त झाली असून ज्यावेळी खर्या मदतीची गरज होती, त्याच वेळी ही मदत प्राप्त झाली असल्याचे सांगून अँड. अजित देशमुख यांनी नामचे आभार मानले आहेत.जिल्हा वासीयांमध्ये यामुळे समाधान व्यक्त होत आहे. पेंडगाव येथे राजेंद्र काळकुटे, घोसापुरी येथे डॉ. भगीरथ बांड, राजेंद्र बांड, पाली येथे रणजित गोरे त्याचप्रमाणे सर्वत्र बाळासाहेब गलधर यांनी या कामी पुढाकार घेतला.
Leave a comment