बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतूकीवर निर्बंध असताना थेट रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक करणार्या चालकाविरुध्द बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.22) ही कारवाई केली.
अशोक अभिमान लांडगे (रा.लक्ष्मणनगर,बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीड जिल्हा लॉकडाऊन आहे, संचारबंदी, जमावबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. सर्व प्रकारच्या वाहतूकीच्या सेवा बंद केलेल्या आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिकांमधून रुग्णांना नेण्यास मुभा आहे. या सवलतीचा गैरफायदा घेत काही रुग्णवाहिका चालक थेट रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक करत असल्याचा प्रकार बीडमध्ये होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला. माजलगावमध्ये प्रवासी सोडून आलेल्या रुग्णवाहिकेचा (एम.एच.24 जे 9254) चालक अशोक अभिमान लांडगे याला विचारपूस केली असता त्याने 1600 रुपयांमध्ये चार प्रवाशांची रुग्णवाहिकेतून वाहतूक केल्याचे सांगितले. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पो.नि.भारत राऊत, सहाय्यक निरीक्षक भास्कर नवले, कर्मचारी गोरक्षनाथ मिसाळ, प्रदीप सुरवसे, अलीम शेख, गणेश हंगे, विकी सुरवसे चालक जायभाये यांनी ही कारवाई केली.
Leave a comment