जिल्ह्यातील तिघांचे रिपोर्टही निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनला एक महिना पूर्ण होत असतानाच आता गुरुवारी (दि.23) बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. आष्टी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या 14 दिवसानंतर दुसर्यांदा घेण्यात आलेला थ्रोट स्बॅब नमुना कोरोना निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी सायंकाळी हा रिपोर्ट बीड जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने आता बीड जिल्हा ‘ग्रीन झोनमध्ये’ येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्ह्यात गुरुवारपर्यंत एकुण 170 थ्रोट स्वॅब नमुने तपासण्यात आले. ते सर्व कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी नव्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात 2 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात 1 अशा तीन जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सायंकाळी हे तीन रिपोर्ट प्राप्त झाले, ते सर्व रिपोर्टही कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तसेच अहमदनगरला उपचार घेणार्या बीड जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला फॉलोअप सॅम्पल निगेटिव्ह आढळून आल्यानंतर गुुरुवारी घेण्यात आलेला दुसरा स्वॅब नमुनाही कोरोना निगेटिव्ह आला त्यामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.या अहवालाकडे सार्यांचे लक्ष लक्ष लागले होते.
साडेबावीस हजार मजुर जिल्ह्यात परतले
राज्य शासनाने ऊसतोड मजुरांना स्वगृही पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मजुर जिल्ह्यात परतू लागले आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 22 हजार 510 ऊसतोड मजुर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात सध्या 36 जण होम क्वॉॅरंटाईनमध्ये तर 312 जण संस्थात्मक अलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
Leave a comment