जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील मौजे पिंपळा येथे गत 14 दिवसापूर्वी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान 14 दिवसानंतर त्याचा फॉलोअप थ्रोट स्वँब नमुना निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता या परिसरातील कंटेंटमेंट झोन व बफर झोन परिसरातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याने तसेच या परिसरात एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्यामुळे गुरुवारी (दि.23) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पिंपळा परिसरात लागू केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल केल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, 7 एप्रिल रोजी पिंपळा येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिंपळा गावापासून तीन किमी परिसरातील सुबेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ढोबळसांगवी व खरडगव्हान हा परिसर कंटेनमेंट झोन तसेच पुढील चार किमी परिसरातील लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, खुंटेफळ, व कोयाळ ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली होती. शिवाय या गाव व परिसरात अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली होती.
दरम्यान पिंपळा परिसरातील तीन किमी परिसरात घरोघर सर्वेक्षण व 7 किमी परिसरातील वाडी-वस्ती-तांडे यामध्ये लक्षणानुसार सर्वेक्षण कार्यवाही 14 दिवस पूर्ण झाले आहे, तसेच येथे आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला थ्रोट स्वँब नमुना (14 दिवसानंतर) निगेटिव्ह आढळून आला आहे. या परिसरात आरोग्य विभागाकडून सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे त्यामुळे तेथील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल करण्यात यावी अशी विनंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी या परिसरातील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने व एकही संशयित रुग्ण या भागात आढळून येत नसल्याने यापूर्वीची प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल केली आहे. दरम्यान या आदेशाशिवाय जिल्ह्यासाठी काढलेले याआधीचे आदेश व यानंतरचे सर्व आदेश लागू राहतील असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.(संग्रहित फोटो)
Leave a comment