जिल्ह्यात नव्याने तिघांचे स्वॅब नमुने तपासणीला
बीड | वार्ताहर
कोरोना संशयितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात (विलगीकरण कक्ष) आज गुरुवारी (दि.23) सकाळी 2 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात 1 अशा तीन जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, सायंकाळी हे तीन रिपोर्ट प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. नगरला उपचार घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला फॉलोअप सॅम्पल निगेटिव्ह आढळून आला असून आज दुसऱ्यांदा त्याचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात येणार आहे या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
बीडसह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. आज गुरुवारी तीन जणांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले आहेत दरम्यान आत्तापर्यंत जिल्ह्यातुन पाठवलेले सर्व 167 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह ठरले आहेत. आता आजच्या 3 रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्याच्यावर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात मागील 14 दिवसांपासून वैद्यकीय अधिकार्यांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.या पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला फॉलोअप सॅम्पल निगेटिव्ह आढळून आला असून आज दुसऱ्यांदा त्याचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात येणार आहे.
पिंपळा (ता.आष्टी) येथील रुग्णाच्या गाव परिसरातील धनगरवाडी, काकडवाडी, खरडगव्हाण, सुंबेवाडी, नांदूर, लोणी, कोयाळ, कुंटेफळ, सोलापूरवाडी, ठोबळसांगवी, या गावात मागील 14 दिवसांपासून सर्वेक्षण केले जात आहे. 2620 घरांचा सर्व्हे करत 12 हजार 345 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 36 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे तर 59 जण 59 जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.(संग्रहित फोटो)
Leave a comment