परस्परविरोधी तक्रारी; बारा जणांवर ग्रामिण ठाण्यात गुन्हे
अंबाजोगाई । वार्ताहर
शेतातील तोडलेल्या झाडाची खोडे काढण्याच्या कारणावरून तालुक्यातील सेलुअंबा शिवारातील गट नंबर 290 मध्ये देशमुख कुटूंबातील दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटातील लोकांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या त्यावरून 12 जणांविरूद्ध ग्रामिण ठाण्यात गुन्हे दाखल झाले. सोमवारी (दि.20) रोजी ही घटना घडली.
गोपाळ देशमुख (47) यांच्या तक्रारीनुसार, आमच्या शेतातील तोडलेल्या झाडाची खोडे जेसीबीने का काढु देत नाहीत अशी कुरापत काढुन गोपाळ यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सहकार्याला दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.त्यानुसार श्रीकृष्ण देशमुख, मोहन देशमुख, किरण देशमुख, दिलीप देशमुख, विलास देशमुख (सर्व रा. सेलुअंबा) ता. अंबाजोगाई यांच्याविरूद्ध ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसर्या गटातील किरण देशमुख यांनीही तक्रार नोंदवली. तुम्ही शेतातील तोडलेल्या झाडांची खोडे जेसीबीने काढु नका. हे शेत मोजणी केल्यानंतरच झाडाची खोडे काढा या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाथा बुक्कयांनी व काठ्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून दत्तात्रय देशमुख, अक्षय देशमुख, राजाभाऊ देशमुख, संतोष देशमुख, भाऊसाहेब देशमुख, गोपाळ देशमुख, संजय देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. या दोन्ही प्रकरणाचा तपास पो.ह. नागरगोजे करत आहेत.
Leave a comment