धारूर । वार्ताहर
मुलीला नांदवण्यास पाठवण्याच्या कारणावरून पती-पत्नीत झालेल्या भांडणादरम्यान संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी (दि.21) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शहरातील वडारगल्ली भागात घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शांताबाई दशरथ धोत्रे (35) असे जिवे मारण्याच्या प्रयत्न झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती दशरथ रामा धोत्रे व शांताबाई यांच्यात मंगळवारी मुलीला नांदवण्यास पाठवण्याच्या कारणावरून भांडण झाले. यावेळी पती दशरथने शांताबाईला चप्पलने मारहाण केली. ‘तू मेल्याशिवाय माझे चांगले होणार नाही’ असे म्हणत दशरथने घरातील पाच लिटर डिझेलचा डब्बा शांताबाईच्या अंगावर टाकून पेटती काडी तिच्या अंगावर फेकून देत जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शांताबाईवर अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असून तिथे पोलिसांनी तिचा वरिल आशयाचा जवाब नोंदवला. आरोपी पतीविरूध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धारूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Leave a comment