गेवराई । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बीड जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. मात्र या कालावधीतही चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. गेवराई शहर आणि तालुक्यातील ताकडगाव शिवारात चोरीच्या दोन घटना घडल्या. चोरट्यांनी सोन्याच्या दांगिण्यांसह रोकड असा हजारोंचा ऐवज लंपास केला. रविवारी (दि.19) या घटना घडल्या.
गेवराई शहरातील अहिल्यानगर येथील एका नागरिकाच्या घराचे गेटचे कुलूप तोडुन तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील सोन्याचे विविध दागिणे व नगदी दहा हजाराची रक्कम तसेच पंधरा लिटर गोडतेल असा पन्नास हजार दोनशे रूपयांचा ऐवज चोरून नेला. दुसरी घटना ताकडगाव शिवारात अब्दुल रहिम यांच्या शेतात घडली. सुभाष रघुनाथ बेलगुडे (रा.बेलगुडवाडी) हे याठिकाणी शेतात सालगडी म्हणून काम करतात. रविवारी रात्री बाराच्या सुमारास चार चोरट्यांनी सुभाष यांना दमदाटी करत त्यांच्या पत्नीला मारहाण करत सोन्याचे दागिणे व नगदी रक्कम असा पंधरा हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या दोन्ही घटनेप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक तडवी व सहाय्यक फौजदार आईटवार हे तपास करत आहेत.
Leave a comment