पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती
बीड । वार्ताहर
पश्चिम महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यात परतणार्या सर्व ऊसतोड मजुरांचा त्यांच्या स्वगृहापर्यंतचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षात उपजिल्हाधिकारी व सहाय्यक निरीक्षक अशा दोन वरिष्ठ अधिकार्यांच्या व इतर कर्मचार्यांची टीम 24 तास मजुरांना आवश्यक ती माहिती व सुविधा देण्यासाठी तत्पर राहणार आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याबाबतची माहिती दिली.
कोरोनाच्या स्थितीमुळे देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील तब्बल 1 लाख 31 हजार ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रातील कारखाना परिसरात अडकले आहेत. सर्व ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. बीड जिल्हा प्रशासनाकडूनही जिल्ह्यात परतणार्या ऊसतोड मजुरांना सुविधा पुरवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ऊसतोड मजुरांसाठी बीड अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी अधिकारी-कर्मचार्यांची टिम कार्यरत राहील. पश्चिम महाराष्ट्रातील 38 साखर कारखाना परिसरातून हे मजूर बीड जिल्ह्यात परतत आहेत. त्या सर्व ऊसतोड मजुर बंधू-भगिणींना सुविधा मिळावी यासाठी हा कक्ष काम करेल. संबंधित कारखाना प्रशासनाकडून पाठवल्या जाणार्या मजुरांची माहितीही नियंत्रण कक्षाला दिली जाईल, जिल्ह्यातील 19 चेकपोस्टवरुन हे सर्व मजुर जिल्ह्यात परततील.
गटप्रमुखांना लोकेशन कळवावे लागणार
पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोड कामगारांना वाहनातून जिल्ह्यात येणार्या त्यांच्या गटप्रमुखांना आपल्या सोबतच्या सर्व मजुरांची संख्या, तसेच सद्यस्थितीत ता कोणत्या भागात, रस्त्यावर आहेत त्याची माहिती बीड कंट्रोल रुमला द्यायची आहे.शिवाय कंट्रोल रुमकडून प्राप्त होणार्या सूचनांचे पालन गटप्रमुखांनी करावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.
असा आहे नियंत्रण कक्ष
ऊसतोड मजुरांच्या सहाय्यतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड (मो. 9420643015, 9834907452) तसेच सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे (मो. 9518366397,8605009000) हे काम पाहणार आहेत. इतर कर्मचारीही इथे नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्ष फोन (02442-230825/222604) या क्रमाकांवर ऊसतोड बांधवांना संपर्क साधून मदत मिळवता येणार आहे.
विरोध केल्यास कारवाई
कारखान्याहून गावी परतताना सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी, तसेच त्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे सारे तपासले जात आहे. हे सारे होत असतानाही मजुरांना विरोेध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कुणाच्याही बाबतीत असा प्रकार झाल्यास तात्काळ स्थानिक पोलीसांशी संपर्क साधून तक्रार करावी. तसेच कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. पोलीस संबंधिताविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.
ऊसतोड मजुरांसाठी मार्ग निश्चित
ऊसतोड मजुरांना स्वगृही परत जाण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्यासाठी मार्ग निश्चित केले आहेत. लातूर, बर्दापूरमार्गे अंबाजोगाई, कळंब, माळेगाव, युसूफवडगाव मार्गे केज,बोरगाव मार्गे केज, तेरखेड मार्गे चौसाळा, वाकीमार्गे आष्टी, खडकत मार्गे आष्टी, जामखेडमार्गे सौताडा, जामखेड, साकतमार्गे पाटोदा, चिंचोडीपाटील,धानोरा मार्गे कडा, आष्टी, दौलावडगाव, धामणगाव मार्गे अंमळनेर, पाथर्डी, मातोरी मार्गे मादळमोही,शेवगाव, महारटाकळी मार्गे उमापूर, मानूरमार्गे शिरुर, शहागाड, खामगाव मार्गे गेवराई असे मार्ग निश्चित केले आहेत. कोणी कोणत्या मार्गावरुन बीड जिल्ह्यात प्रवेश करावयाचा याची माहिती कंट्रोल रुममधून साखर कारखाना प्रशासनाला दिली जात असल्याचेही एसपी पोद्दार यांनी सांगीतले.
Leave a comment