दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाचं कामकाज २० एप्रिलपासून अर्थात आज सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिकृतरित्या हा आदेश जारी करण्यात आलाय. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सचिवालयांचं कामकाज बंद करण्यात आलं होतं. तसंच लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज २४ मार्चपासून अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. लोकसभेत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ एप्रिल रोजी समाप्त होणार होतं. परंतु, निर्धारित वेळेपूर्वीच हे कामकाज स्थगित करण्यात आलं.
लोकसभा सचिवालयाच्या अधिकृत आदेशानुसार, सोमवारपासून दोन्ही कार्यालयांत काम सुरू होईल. संयुक्त सचिव स्तरावर आणि त्यांच्यावरचे अधिकारी कार्यालयातातून काम हाताळतील. याशिवाय इतर अधिकारी आळीपाळीनं काम करतील.
कार्यालयातून काम करताना सचिवालयाचे कर्मचारी सोशल डिस्टिन्सिंगचं पालन करतील, असंही आदेशात म्हटलं गेलंय. ई-कार्यालयात फाइल इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच धाडली जाईल. अपवाद केवळ लोकसभा अध्यक्षांच्या विचारार्थ अत्यावश्यक फाइल्सचा असेल, असंही यात म्हटलं गेलंय.
Leave a comment