10 फुटापर्यंतच्या आकर्षक गणेशमूर्तींनी वेधले लक्ष!
यंदा 30 टक्क्यांनी वाढल्या गणेशमूर्तीच्या किमंती
बीड । सुशील देशमुख
सुखकर्ता-दुखहर्ता असलेल्या लाडक्या गणरायाचे येत्या 7 सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरातील एमआयडीसी, अयोध्यानगर तसेच इतर भागात जवळपास 50 ते 60 गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने असून या सर्वच ठिकाणाहून बीड जिल्ह्यासाठी कमीतकमी 3 लाख ते अधिकाधिक 10 लाखांहून अधिक घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठीच्या मूर्ती तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून मूर्तीकार या ठिकाणी गणेशाच्या विविध आकारातील आणि आकर्षक रुपातील मूर्ती तयार करत आहेत. यंदा पीओपीच्या मूर्तीच्या किमंतीत 20 ते 30 टक्के वाढ झाल्याचे विक्रेते अर्जुन दळे व नितेश चित्रे यांनी सांगितले. शासन अन् समाजाकडून कलेचा सन्मान होत नसल्याची खंतही मूर्तीकार नितेश चित्रे यांनी व्यक्त केली.
बीड शहरातलगतच्या कारखान्यात सध्या 6 इंचीपासून 10 फुट उंचीच्या आकारातील गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरु आहे. या कारखान्यांमध्ये बाल गणेश, दगडूशेठ हलवाई, ज्योतिबा, लालबागचा राजा,मयुरेश गणेश, बैलगाडीत बसलेला गणेश अशा विविध रुपातील गणेशाच्या मूर्ती तयार करण्यात येत आहेत. एमआयडीसीतील संत गोरोबा काका गणपती कारखान्यात या मूर्तींना विक्रेत्यांकडून तसेच गणेश भक्तांकडून मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले. गणेश उत्सावासाठी गणेश मुर्तींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सध्या या कारखान्यामध्ये सुरू आहे.
शहरातील 60 गणेश मुर्ती तयार करणार्या कारखान्यांव्दारे राज्यातील संभाजीनगर,परभणी, जालना, लातूर, पुणे, धाराशिव यासह अन्य जिल्ह्यात मुर्ती पाठवून गणेश मुर्ती तयार करणारा जिल्हा म्हणून आता जिल्ह्याची नवी ओळख होत आहे. साधारण आठ ते दहा महिन्यांपासून गणेश मुर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. शहराच्या परिसरात जवळपास 60 कारखाने असून या कारखान्यातून शेकडो कारागिरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सावकाराकडून खाजगी कर्ज घेवून मुर्ती विक्रीतून ते परत करण्याची वेळ कारखानदारांवर आली असून दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असताना शासनाकडून मात्र दुर्लक्षीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाकडून इको फेंडली गणेश मुर्ती तयार करण्याचे सांगण्यात येते,मात्र यासाठी लागणारी माती उपलब्ध करून देण्यात येत नाही तसेच या मुर्तीची किमंत दुप्पट असल्याने ग्राहकही मिळत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
विश्वकर्मा योजना कागदावरच
कारागिरांसाठी शासनाने विश्वकर्मा योजना आणली परंतू या योजनेचा अद्याप एकाही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नाही, त्यामुळे हा व्यवसाय सांभाळणेही अवघड झाले आहे. गणेश मुर्तीसाठी लागणार्या साहित्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अशा परिस्थिती हा पारंपारीक व्यवसाय जतन करून तो चालवणे ही व्यवसायीकांसाठी तारेवरची कसरत बनली आहे. अनेक समस्यांना तोंड देत आजही हा व्यवसाय बीड शहरात सुरू आहे अशी प्रतिक्रिया कुंभश्री कारखान्याचे अर्जुन दळे यांनी दिली.
बीडला मोठी बाजारपेठ हवी
गणेश मूर्तीकारांना शासनाकडून कर्ज पुरवठा होत नाही. आम्ही पारंपरिकमूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतो मात्र कलेची किंमत शासन आणि समाज करत नाही अशी खंत विक्रेते नितेश चित्रे यांनी व्यक्त केली. तसेच बीडला मोठी बाजारपेठ हवी, तरच मूर्तीकारांना सुगीचे दिवस येवू शकतात असेही ते म्हणाले. 51 रुपयांपासून 12 हजार 1 रुपयांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी तयार केल्या जात असल्याचे ते म्हणाले.
Leave a comment