महाट्राफिक अॅपमुळे ऑनलाईन तक्रारींचे होतेय निराकरण
बीड । वार्ताहर
महाट्राफिक अॅपच्या माध्यमातून नागरिकांनाही त्यांच्या वाहनावर चूकीच्या पध्दतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली असेल तर त्याबाबत आक्षेप नोंदवता येतो. चालू वर्षभरात अशा पध्दतीने कारवाया झाल्यानंतर 33 वाहनचालकांनी ऑनलाईन तक्रार वाहतूक पोलीस यंत्रणेकडे दाखल केली. त्या प्रकरणात पोलीसांनी 33 खटल्यात नागरिकांचे आक्षेप मान्य करत त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली आहे. ‘महाट्राफिक अॅप’मुळे हे शक्य झाले आहे.
सार्वजनिक ठिकाणी वाहने चालवताना वाहतूक नियमांचे पालन वाहन चालकांकडून झाले नाही तर वाहतूक पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. किंवा इ-चालन दाखल केले जाते. मात्र महा ट्राफिक अॅपच्या माध्यमातून नागरिकांनाही सिव्हीलेन्स म्हणून ऑनलाईन तक्रार दाखल केली जाते. या तक्रारी डीजी ऑफीसकडे जातात. त्यानंतर त्याबाबत वाहतूक शाखेकडून पुढील कार्यवाही पार पाडली जाते. बीड जिल्ह्यात 1 जानेवारी ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत अशा प्रकारच्या 64 तक्रारींची वाहतूक शाखेने दखल घेवून संबंधितांवर इ-चालन केले. तर 150 तक्रारी पुराव्याअभावी फेटाळून लावल्या आहेत.
तसेच जर वाहतूक पोलीसांकडून चुकीची कार्यवाही झाली असे नागरिकांना वाटले तर त्यांनाही या कार्यवाहीबाबत तक्रार महाट्राफिक अॅपवर ऑनलाईन नोंदवता येते. चालू वर्षी वरील कालावधीत एकूण 136 तक्रारी दाखल झाल्या. त्यातील 65 तक्रारींची खातरजमा करत त्या फेटाळण्यात आल्या आहेत तर 33 तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेकडून नागरिकांचे आक्षेप मान्य केले. याशिवाय 37 तक्रारींमध्ये कारवाईदरम्यान वाहनांचे क्रमांक चुकल्याने ते दुरुस्त करत दुसर्याच वाहनचालकांवर झालेला दंड टाळून संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली गेली आहे. तसेच 1 तक्रार प्रलंबित असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
Leave a comment