पीकविमा कंपनीला आढळून आली तफावत

विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरु: बोगस विमा रद्द होणार ?

 

बीड । वार्ताहर

खरीपाचे पेरणी क्षेत्र कमी अन् भरलेला पीक विमा मात्र अधिक हेक्टरवर. असा प्रकार बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणे उघड झाला आहे. दरम्यान सीएससी सेंटरवर ऑनलाईन  पीक विमा भरला गेला आहे. मात्र आम्ही पेरणी झालेले एकूण क्षेत्र अन् पीकविमा भरलेले क्षेत्र यातील तफावत लक्षात घेतली असून आता बोगस पीकविमा भरला कसा गेला याचे सर्वेक्षण करणे सुरु केले आहे. बोगस पीक विमा रद्द केला जाणार असल्याची माहिती भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. पीकविमा रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी काही जणांनी पेरणी नसतानाही त्या क्षेत्रावर पीक पेरणी दाखवून पीकविमा भरल्याचा संशय विमा कंपनीला आहे. महत्वाचे हे की, पीकविमा भरताना असे प्रकार होवू नयेत म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक कृषी कार्यालयाकडून शेतकर्‍यांना आवाहनही करण्यात आले होते. दरम्यान बीड जिल्ह्यासारखाच प्रकार महाराष्ट्रात अन्य काही जिल्ह्यात झाला असण्याची शक्यता विमा कंपनीला असून त्या दृष्टीने माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

 

यंदा बीड जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी न करता 2 लाख 13 हजार 852 हेक्टर पिकांचा विमा उतरवला गेल्याचे पीकविमा कंपनीच्या अहवालातून समोर आले आहे. दरम्यान सीएससी केंद्रावर शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा हा भरला जातो. त्यामुळे अधिक विमा भरला जातो. विमा कंपनीकडून याची पडताळणी करण्यात येणार आहे.जिथे संशय येईल तेथील विमा संरक्षण रद्द केले जाणार असल्याची माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे बीड जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांनी दिली.

 

बीड जिल्ह्यात यंदा खरीपाचे 7 लाख 85 हजार 786 हे. क्षेत्र असून 7 लाख 74 हजार 848 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पैकी 7 लाख 75 हजार 662 क्षेत्रावरील पिके शेतकर्‍यांनी विमा संरक्षित केले आहेत तर काही शेतकर्‍यांनी पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.म्हणूनच 19 हजार 186 हेक्टरचा पीक विमा भरण्यात आला नसल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जिल्ह्यात कापसाच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीची पेरणी अधिक झालेली आहे. दरवर्षी बीड जिल्ह्यात खरिप हंगामात शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुग, सुर्यफुल आणि मका या पिकांची पेरणी करून उत्पादन घेत असतात.

 

यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र 3 लाख 71 हजार 53 हेक्टर असताना 5 लाख 43 हजार 620 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला गेला आहे. म्हणजेच सोयाबीनचा 1.72 लाख हेक्टरवर जास्त पेरा दिसत असल्याचा पीकविमा कंपनीला संशय आहे. हीच स्थिती कांद्याची आहे. जिल्ह्यात खरीपात 4 हजार 659 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड असताना तब्बल 23 हजार 929 हेक्टरचा विमा उतरवला गेला आहे. म्हणजेच 19 हजार 270 जास्त लागवड दाखवण्यात आली आहे.

 

भुईमुगाच्या बाबतीतही जिल्ह्यात 6 हजार 349 जास्त पेरा दाखवला गेला. कारण भुईमुगाचे पेरणी क्षेत्र 1 हजार 36 हेक्टर असताना  7 हजार 385 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला गेला.जिल्ह्यात तूरीची पेरणी 49 हजार 430 हेक्टर क्षेत्रावर झालेली असून 51 हजार 624 हेक्टर क्षेत्राचा विमा काढला गेला आहे. 2 हजार 194 जास्त क्षेत्र पेरणीचे दाखवले गेले आहे. बीड जिल्ह्यात यंदा शेतकर्‍यांनी 11 हजार 406 हेक्टरवर मुग पेरणी केली असली तरी विमा मात्र  24 हजार 878 हेक्टर क्षेत्राचा काढला गेला आहे. म्हणचे मुगाचा 13 हजार 472 हे. जास्त पेरा दाखवला आहे.

 

कृषी विभागासह विमा कंपनी करणार पडताळणी

बीड जिल्ह्यात खरिपाचे पेरणी झालेले क्षेत्र आणि सीएससी सेंटरवर काही प्रमुख पिकांचा उतरवलेला विमा याचे क्षेत्र, यामध्ये तफावत आढळून आले आहे दरम्यान याबाबत विमा कंपनीकडून जिल्हा कृषी विभागालाही अवगत करण्यात आले आहे. विमा कंपनी आणि जिल्हा कृषी विभागाचे पथक याबाबतची पडताळणी करतील. पडताळणी दरम्यान जर पेरणी क्षेत्र पेक्षा अधिकचा विमा आढळून आला तर तो विमा रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल,असे भारतीय विमा कंपनीचे व्यवस्थापक बाबासाहेब इनकर सांगितले.

 

 

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.