जिल्ह्यात 147 प्रकल्पांत 14.64 टक्के पाणीसाठा
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात जून व जुलै या दोन महिन्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 57.06 टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे 4 टक्क्यांवर पोहचलेला प्रकल्पीय पाणीसाठा आता सततच्या पावसामुळे वाढून 57.6 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात अजूनही 19 प्रकल्प कोरडे आहेत. तर 70 प्रकल्पांची पाणीपातळी ज्योत्याखाली गेलेली आहे.जिल्ह्यात मागील दिवसांत झालेल्या पावसामुळे 2 मध्यम व 10 लघू असे 12 प्रकल्प 100 टक्के क्षमतेने भरले आहेत.
बीड जिल्ह्यात यंदा खरिपाचे 7 लाख 50 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात कापसाच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीची पेरणी अधिक झालेली आहे. दरवर्षी बीड जिल्ह्यात खरिप हंगामात शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुग, सुर्यफुल आणि मका या पिकांची पेरणी करून उत्पादन घेत असतात.यंदा जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पेरणीयोग्य पाऊस झाला खरा,मात्र पावसाने मोठी दडी मारली. त्यामुळे प्रकल्पीय पाणीसाठा वाढला नव्हता. नंतर जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाणीसाठ्याच किंचित वाढ होवू लागली आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात गोदावरी,कृष्णा खोर्यांतर्गत 143 प्रकल्प आहेत.तसेच बीड पाटबंधारे विभागाअंतर्गत 1 मध्यम व 22 लघू असे एकूण 166 प्रकल्प आहेत. सध्या यापैकी 19 लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. 22 प्रकल्प सध्या 100 टक्के भरलेले असून 8 प्रकल्पांमध्येे 75 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.50 ते 75 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरलेल्या प्रकल्पांची संख्या 7 झाली आहे. तर 15 प्रकल्पांमध्ये 25 ते 50 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय 24 प्रकल्प असे आहेत की यामध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर 71 प्रकल्पांचा पाणीसाठा ज्योत्याखाली गेला आहे. तसेच 16 मध्यम प्रकल्पात मिळून 29.64 टक्के पाणीसाठा असून उर्वरित 126 लघु प्रकल्पात 18.33 टक्के पाणीसाठा आहे. माजलगाव या जिल्ह्यातील एकमेव मोठ्या प्रकल्पात 142 दलघमी इतका मृत पाणीसाठा आहे. यावर आणखी काही महिने पिण्यासाठी पाणी उपलब्ध होवू शकते.जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी 699.30 मिलीमीटर असून यापैकी मागील आठवड्यापर्यंत 378.10 मिलीमीटर पाऊस झालेला आहे.
Leave a comment