24 तासात जिल्ह्यात 19.2 मिलिमीटर पाऊस
बीड । सुशील देशमुख
जिल्ह्यात दोन दिवसापासून उघडीत दिलेल्या पावसाने आगमन झाले आहे सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात 24 तासात 19.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस परळी तालुक्यात झाला आहे बीड तालुक्यातील लिंबागणेश (74.5 मि.मी.) व अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर महसूल मंडळात (69.3 मि.मी.) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.www.lokprashna.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
बीड शहरात अनेक भागात 20 दिवसानंतरही पाणीपुरवठा नाहीच
बीड शहराला सध्या माजलगाव बॅक वॉटरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो; मात्र प्रकल्पातच पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही जे काही शिल्लक पाणी आहे. त्यातूनच बीडकरांना पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो आहे.यापूर्वी 12 ते 14 दिवसात एकदा पाणीपुरवठा केला जात होता आता त्यात वाढ होऊन चक्क वीस दिवस उलटून गेल्यानंतरही नळाला पाणी आलेले नाही त्यामुळे नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट होताना दिसत आहे. बीड नगरपालिकेकडून मात्र दरवेळी पत्रके काढून वीजपुरवठा खंडित झाला, विजेचे खांब कोसळले त्यामुळे पाणीपुरवठ्याला उशीर होत आहे अशी कारणे सांगितली जातात, वास्तविक शहरातील अनेक भागांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाणाचे पाण्याच्या बाबतीत हे हाल आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या नियोजनाबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होताना दिसतो.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
मागील आठ दिवसापासून बीड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली त्यामुळे खरिपाच्या पेरण्या धोक्यात येतात की काय याची शेतकर्यांना धास्ती होती. दरम्यान रविवारी रात्रीपासून बीड तालुक्यासह जिल्हा ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे सर्वाधिक 45.5 मिलिमीटर पावसाची नोंद परळी तालुक्यात झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात 33.1 मिलिमीटर तर बीड तालुक्यात 24.3 केज तालुक्यात 29.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. माजलगाव तालुक्यात 18.5 मिलिमीटर, गेवराई तालुक्यात 5.2, आष्टी 1.3 मिलिमीटर तर वडवणी तालुक्यात 6.5 धारूर 10.1 मिलिमीटर व शिरूर कासार तालुक्यात 1.4 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती महावेध या शासकीय पोर्टलवरून कृषी विभागाने दिली आहे. दरम्यान मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ 0.6 मिलिमीटर पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची स्थिती चांगली आहे; असे असले तरी जिल्ह्यात प्रकल्पीय पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. केवळ साडेतीन टक्के पाणीसाठा प्रकल्पांमध्ये शिल्लक असून अजूनही जिल्ह्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
प्रकल्प कोरडेच; केवळ 3.57 टक्केच पाणी साठा
जिल्ह्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल झालेला असून 1 जूनपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. मात्र पडलेल्या पावसाचा मोठा फायदा कुठल्याही प्रकल्पाला झालेला दिसून येत नाही. त्यामुळे जुलैचा पहिला आठवडा सरला तरी जिल्ह्यात टंचाई स्थिती कायम आहे. जिल्ह्यात केवळ 3.57 टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे.बीड जिल्ह्यात 1 मोठा, 16 मध्ये आणि 126 लघु असे एकूण 143 प्रकल्प आहेत. सध्या पूर्ण भरलेला तसेच 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेलाही एकही प्रकल्प नाही. 51 ते 75 टक्केदरम्यान केवळ एका प्रकल्पात पाणी आहे. 25 ते 50 टक्के पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या 8 असून 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या24 आहे. 74 प्रकल्प हे उपयुक्त साठ्याच्या जोत्याखाली आहेत, तर 36 प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. त्यामुळे जिल्ह्याला मोठ्या पावसाची गरज आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या पेरण्याही 95 टक्के पूर्ण झालेल्या आहेत. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने काही तालुक्यांत पावसाची आवश्यकता आहे. येत्या काही दिवसांत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.जिल्ह्याची पाववसाची वार्षिक सरासरी 566.1 मिमी आहे. 1 जूनपासून 8 जुलैपर्यंत 231.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दोन महिन्यातील सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण 40.9 टक्के इतके आहे. बीड जिल्ह्यात आता पाऊस पडत असला तरी प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
Leave a comment