बीड जिल्ह्यात 18 बँकांच्या 209 शाखांना 1707 कोटींचे उद्दिष्ट
बीड । सुशील देशमुख
खरीप हंगामातील पेरणीसाठी जिल्ह्यातील 18 बँकांच्या 209 शाखांना जिल्हा अग्रणी बँकेकडून 1 हजार 707 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. जून 2024 अखेर या सर्व बँकांनी बीड जिल्ह्यात 95 हजार 543 शेतकर्यांना 756 कोटी 41 लाखांचे पीककर्ज वितरित केले असून उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण 44 टक्के आहे. सर्वाधिक 310 कोटींचे पीक कर्ज वितरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केले आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज वाटपात (215 कोटी) दुसर्या स्थानावर असून स्टेट बँक ऑफ इंडियाने 172 कोटींचे पीककर्ज वाटप करत तिसरे स्थान मिळवले आहे. इतर बँकांनी मात्र पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पाहता वाटपात मात्र संथगती कायम ठेवल्याचे कर्ज वाटपाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
शेतकर्यांना वेळेवर पेरण्या करण्यासाठी खते व बि-बियाणे खरेदी करता यावीत यासाठी दरवर्षी बँकांना जिल्हास्तरीय बँकर्स समिती पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देते. यंदा खरिप हंगामासाठी बीड जिल्ह्यातील 18 बँकांना 1707 कोटींचे उद्दिष्ट दिले गेले आहे. परंतू काही मोजक्या राष्ट्रीयकृत बँका वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज उद्दिष्ट गाठलेले दिसत नाही. 30 जून अखेरपर्यंत 95 हजार 543 शेतकर्यांना 756 कोटी 41 लाखांचे पीककर्ज वितरित केले आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकाच्या जिल्ह्यातील 74 शाखांमधून 219 कोटी 51 लक्ष तसेच खासगी क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकाच्या 27 शाखांमधून 11 कोटी 8 लक्ष रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 51 शाखांनी सर्वाधिक 310 कोटी 19 लक्ष रुपयांचे पीक कर्ज दिले आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 57 शाखांमधून 215 कोटी 63 लाखांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 85 हजार 786 इतके आहे.आता जवळपास 89 टक्क्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 3 जुलै अखेर खरिपाच्या 7 लाख 4 हजार 066 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकर्यांना पीककर्ज देण्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 51 शाखांमदून 35 हजार 535 शेतकर्यांना 310 कोटी 19 लाख रुपये, बीड डीसीसी बँकेने 57 शाखांमधून 40 हजार 931 शेतकर्यांना 215 कोटी 63 लाखांचे तर एसबीआयने 48 शाखांच्या माध्यमातून 14 हजार 779 शेतकर्यांना 172 कोटी 20 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. दिलेले उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही सर्व बँक व्यवस्थापकांना दिल्या असून शेतकर्यांना सुलभ पध्दतीने पीक कर्ज मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात. केवळ कागदी मेळ लावून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पुर्ण करु नये, प्रत्यक्षात अडल्या-नडलेल्या शेतकर्याला पीककर्ज तात्काळ मिळावे अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
तीन बँकांनी दमडीही दिली नाही! कारवाई होणार का?
जिल्हास्तरीय बँकर्स समितीकडून 18 बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट दिले गेले असले तरी यातील आयडीबीआय, डीसीबी आणि कोटक महिंद्रा बँकेने एक रुपयाही पीककर्ज वाटप केलेले नाही. महत्वाचे म्हणजे या तीन बँकांच्या जिल्ह्यात 8 शाखा कार्यान्वीत आहेत. या तीन बँकांसाठी बँकर्स समितीने खरीप 2024 साठी 17 कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. यात आयडीबीआयला 6 कोटी, डीसीबीला 3 कोटी व कोटक महिंद्रा बँकेला 8 कोटींचे उद्दिष्ट आहे.परंतु 30 जूनपर्यंत या बँकांनी एकाही शेतकर्याला पीककर्ज वितरित केलेले नाही. या बँकावर कार्यवाही होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Leave a comment