आता पत्रव्यवहारासाठी शिक्षकांना मुख्यालय सोडावे लागणार नाही
सीईओ अविनाश पाठक यांचे निर्देश
बीड । वार्ताहर
बीड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा,जि. प.माध्यमिक शाळा,गटशिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी(प्रा.)कार्यालय यांच्या मध्ये होणारा पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्यात यावा असे निर्देश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत.दरम्यान सदर कार्यवाही करण्यासाठी व शाळा स्तरापर्यंत ही कार्यवाही पोहोचण्यासाठी पुढील सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सदर कार्यवाही ही प्राधान्यक्रमाने आगामी 180 दिवसांमध्ये करण्याबाबत तिन्ही शिक्षणाधिकारी सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी प्राधान्य क्रमाने पाऊले उचलून पूर्ण करण्याबाबत सीईओ अविनाश पाठक यांनी निर्देशित केले आहे.
याबाबत माहिती देताना सीईओ अविनाश पाठक यांनी म्हटले आहे की, जि.प. प्राथमिक शाळा यांचा पत्र व्यवहार केंद्रीय प्राथमिक शाळेला करतात व तेथून हा पत्र व्यवहार गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला होतो. हा पत्र व्यवहार करण्यासाठी बर्याच वेळा कार्यालयीन कर्मचारी अथवा परिचर उपलब्ध नसल्यामुळे कार्यरत असणारे शिक्षक या पत्रव्यवहारासाठी मुख्यालय सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षकांनी अशा पत्रव्यवहारासाठी मुख्यालय सोडल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधिकारावर परिणाम होतो व त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. काही वेळा काही वेळा अशी कारणे दाखवून विनाकारण मुख्यालय सोडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. या सर्व बाबी टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यामधील सर्व पत्र व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केल्यास केल्यास तो सोईस्कर होईल व मनुष्य तासांचा अपव्यय होणार नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून सदर सर्व पत्र व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्याचे निर्देशित करण्यात आले. हा पत्र व्यवहार करताना होणारी कार्यपद्धती ही सर्वांसाठी सारखी असावी म्हणून सीईओंनी निर्देशही दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ई-ऑफिस ही प्रणाली राबविण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर कार्यवाहीसाठी ई-मेल आयडी तयार करणे, सदर ई-मेल आयडी शासनाच्या डोमेनवर तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. सदर कार्यवाही करण्यासाठी व शाळा स्तरापर्यंत ही कार्यवाही पोहोचण्यासाठी पुढील सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सदर कार्यवाही ही प्राधान्य क्रमाने पुढील 180 दिवसांमध्ये करण्याबाबत तिन्ही शिक्षणाधिकारी सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी प्राधान्य क्रमाने पाऊले उचलून पूर्ण करण्याबाबत सीईओ अविनाश पाठक यांनी निर्देशित केले आहे.
शिक्षकांना जबाबदारी देवू नये
यापुढे पत्रव्यवहार दाखल करणे या कामासाठी कोणत्याही शिक्षकांना अशा जबाबदारी देण्यात येऊ नये किंवा अशा कारणासाठी शिक्षकांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरहजरी ग्राह्य धरण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), (माध्यमिक) यांनी सुद्धा असा पत्र व्यवहार हार्ड कॉपी ऑफिस स्वरूपामध्ये करण्यासाठी कोणताही आग्रह धरू नये असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे.
जिल्ह्यात 2476 शाळा कार्यान्वीत
बीड जिल्हा परिषदेअंतर्गत 2417 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,164 केंद्रीय शाळा,59 जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अशा एकूण 2476 शाळा आहेत. या शाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 164 केंद्रप्रमुख, 54 विस्तार अधिकारी,11 गटशिक्षणाधिकारी व 3 शिक्षणाधिकारी(प्रा.)(मा.) (यो)जिल्ह्यात कार्यरत आहेत.
Leave a comment