प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेप्रसंगी गजानन ज्योतकरांनी केले मुख्य पूजेचे पौराहित्य
वीस वर्षापासून घेतले अखंड वेद अध्ययनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण
बीड । दीपक सर्वज्ञ
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आयोध्येतील प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (दि.22) अवघ्या विश्वाने ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला पाहिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव परमपूज्य राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यासह पूजेचे यजमान मिश्रा दांपत्य व इतर संत महंतांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त सुमारे 84 सेकंदांचा होता, 121 पुजार्यांच्या पथकाकडून हा विधी केला गेला. यात काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी होते. त्यांच्यासह 5 पुजारी गाभार्याच्या आत उपस्थित होते.पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा करत असताना, मोदींकडून विधी करून घेण्याचा मान बीडचे पुरोहित गजानन ज्योतकर यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने पंतप्रधान मोदी यांनी हे रामललाची विधीवत प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली. बीडचे विद्वान ब्रह्मवृंद गजानन यांच्यामुळे देशभरात बीडचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने झळकले. तिकडे अयोध्येत गजानन ज्योतकर गुरुजींनी मुख्य पूजेचे पौरोहित्य करतानाचे व्हिडिओ पाहताच इकडे त्यांच्या आई-वडिलांसह कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांना आनंद गगनात मावेनासा झाला.अनेकांनी गजानन यांचे वडील दिलीप महाराज ज्योतकर यांना संपर्क करत त्यांचे अभिनंदन केले.ज्योतकर कुटुंबियांसाठी अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ अन् कायम स्मरणात राहणारा ठरला आहे.गजानन ज्योतकर यांच्यामुळे बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
या पूजेचे पोरोहित्य करण्याचा मान बीडचे राहिवाशी वे.शा.स. गजानन दिलीप ज्योतकर यांना मिळाला. या अनुषंगाने ज्योतकर कुटुंबीयांशी ‘लोकप्रश्न’ने संवाद साधला असता ज्योतकर कुटुंबीय या भाग्याच्या क्षणांनी भारावून गेले होते. गजानन यांचे वडील दिलीप आणि आई कावेरी ज्योतकर म्हणाल्या, इतक्या मोठ्या पूजेचे पौरोहित्य करण्याचा मान आपल्या मुलाला मिळेल याची आम्ही कधीही कल्पना केली नव्हती पण आज गजाननला मुख्य पूजेचे पौरोहित्य करताना टीव्हीवर पाहिले आणि आमचे डोळे आनंदाने भरून आले. मुलाने कुटुंबाचे नाव केले अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते दोघेही सद्गतीत झाले. गजानन यांची आजपर्यंतची झालेली वाटचाल याबाबत माहिती देताना त्यांचे वडील दिलीप महाराज ज्योतकर म्हणाले, आमच्या घरात पुरोहित म्हणून काम करण्याची परंपरा वडिलांपासून चालत आलेली आहे. कळसंबर (ता.बीड) हे आमचे मुळ गाव याच ठिकाणी आमची शेतजमीन आणि घर देखील आहे. गजानन हा घरातील लहान मुलगा तर त्याचा मोठा भाऊ हा बीडमध्ये व्यवसाय निमित्त स्थायिक झालेला. आता कुटुंबीय बीडमध्येच धोंडीपुरा काळे गल्लीत वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच गजाननला अध्यात्माची ओढ होती. संस्कृत भाषा आणि वेद अध्ययन हे दोन्ही विषय त्याच्या आवडीचे. त्यामुळे हा मुलगा वेद अध्ययनात पुढे चांगले यश मिळवेल याची कल्पना आम्हाला तेव्हाच आली होती असे त्यांनी सांगितले.
वे.शा.सं.अनंतशास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली घडले गजानन!
गजानन हा इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना वे.शा.सं. अनंतशास्त्री गोंदीकर महाराज हे दिलीप ज्योतकर यांच्या घरी आले होते. त्यांनी गजाननकडून काही स्त्रोत्र आणि श्लोक म्हणवून घेतले. त्याचे शब्द ज्ञान पाहून अनंतशास्त्री महाराजांना गजाननची वेद अध्ययनातील गोडी लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ‘ तुमच्या मुलाला वेद शिक्षणासाठी आळंदीला पाठवा, त्यासाठी तुम्ही परवानगी द्या असे गजाननच्या वडिलांना म्हटले होते, नंतर कुटुंबीयाने शालेय शिक्षण घेतानाच गजाननला वेद अध्ययनासाठी आळंदी येथे पाठवले तिथे त्याने 6 वर्ष शिक्षण पूर्ण केले. गजानन ज्योतकर यांनी येथील सावरकर महाविद्यालयात उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी धुळे येथील श्रीराम वेद विद्यालयात पौराहित्याचे शिक्षण घेतले. तर, आळंदी (जि. पुणे) येथील सद्गुरु निजानंद महाराज विद्यालयात वेदाच्या संहितेचे शिक्षण पूर्ण केले
वेद परीक्षेत पावणेपाच लाख
विद्यार्थ्यात गजानन आले होते सर्वप्रथम
आळंदी येथील वेद अध्ययनाचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर गजानन यांनी केशव गुरुजी आयाचित (रा.लातूर) यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे कर्मकांडासंबंधीचे शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांनी वेदांचा अभ्यास करतानाच मनन, चिंतन आणि अभ्यास सुरु ठेवला. सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य शब्दउच्चार याची सांगड घालत नंतर गजानने आपल्या कुटूंबियासोबतच अनंतशास्त्री गोदींकर यांचे कायम मार्गदर्शन घेतले. वाराणशी येथे असताना 2016 मध्ये घेण्यात आलेल्या वेदअध्ययन परीक्षेत तब्बल पावणेपाच लाख विद्यार्थ्यांमधून गजानन ज्योतकर हे प्रथम क्रमाकांने उर्त्तीण झाले होते. त्यावेळी त्यांचा विद्यमान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता.
गजानन यांची संस्कृत विषयात पीएचडी
इतर चार विद्यार्थ्यांना देतात वेदाचे शिक्षण
धुळे येथे 4 वर्षांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा अनंतशास्त्री गोंदीकर महाराजांच्या सांगण्यानुसार वाराणशी (उत्तरप्रदेश) येथे संस्कृत भाषा अभ्यासाचे शिक्षण पुर्ण केले. वेद अध्ययन पुर्ण झाल्याने संस्कृतचाही मोठा व्यासंग गजानन यांना जडलेला. त्यामुळे साहजिकच पुढे त्यांनी वाराणशी विद्यापीठातून संस्कृत विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली. महत्वाचे हे की, गत 12 वर्षांपासून गजानन ज्योतकर हे वाराणशी येथेच संस्कृत अध्ययन आणि वेद शिक्षण प्रबोधनाचे कार्य करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता चार विद्यार्थी वेद ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करत असल्याची माहिती गजानन यांच्या आई कावेरी दिलीप ज्योतकर यांनी दिली.
राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराजांचा पुढाकार
वे.शा.सं.गजानन ज्योतकर हे बीडच्या भूमीतील,मात्र सर्व शिक्षण त्यांनी वाराणशी येथे राहून घेतले. वे.शा.सं.गजानन ज्योतकर हे द्रविड शास्त्री यांचे शिष्य आहेत. श्रीराममूर्तींची प्राणप्रतिष्ठा पुजा पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते झाली. यावेळी मोदी यांच्याकडून पूजा विधी करुन घेण्याचा मान बीड येथील पुरोहित गजानन ज्योतकर यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने श्रीरामलल्लांची विधीवत प्राणप्रतिष्ठा व पूजा केली. वास्तविक पुजेचे पौरोहित्य करण्याचा मान कोणाला मिळेल? हे कोणालाही माहित नव्हते, मात्र राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराजांच्या पुढाकारातून हे शक्य झाले अशी भावना ज्योतकर कुटूंबियांनी व्यक्त केली.
हा तर आमच्या भाग्याचा क्षण;कुटूंबिय भारावले
आठ दिवसांपूर्वी गजाननशी फोनवरुन बोलणे झाले होते. प्रभु श्रीराम मूर्तीं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी गर्भगृहात पुजेचे पौरोहित्य करण्यासाठी जाईल असे तो म्हणाला होता.आज गजाननला मुख्य पूजेचे पौरोहित्य करताना टीव्हीवर पाहिले आणि आमचे डोळे आनंदाने भरून आले. मुलाने कुटुंबाचे नाव केले, हा क्षण आम्हा सर्वांसाठी भाग्याचा आहे अशी प्रतिक्रिया कुटूंबियाने दिली. गजानन यांच्या कुटूंबात वडिल दिलीप, आई कावेरी, मोठा भाऊ दीपक,भावजय सौ.योगिता आणि विवाहित बहिण सौ.गितेांजली खडके असे सदस्य आहेत.याप्रसंगी मामा चंदक्रांत जोशी व त्यांचा परिवार उपस्थित होते.
Leave a comment