रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.राजेंद्रसिंह राणा यांचे प्रतिपादन
बीड । वार्ताहर
नव्याने बंधारे बांधणे, तलाव बांधणे किचकट व उशिरा होणारी प्रक्रीया आहे. मात्र, सद्यस्थितीत नादुरुस्त बंधार्यांची दुरुस्ती, केटीवेअर बंधार्यांना गेट बसविणे, तलावांतील गाळ काढणे, नदीतीरांवरील अतिक्रमणे काढणे, नद्यांची हद्द निश्चित करणे, गाळ काढणे आणि वनीकरण वाढविणे हे दुष्काळमुक्तीसाठी मोठा उपाय असल्याचे मत जलपुरुष अशी ओळख असलेल्या व रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले.बीड जिल्ह्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सामुदायिक प्रयत्न हवेत.वनक्षेत्र प्रचंड संख्येने वाढवावे अन् पावसाचे पाणी जमिनीतच मुरवावे असे आवाहनही त्यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपक्रमाची माहिती आणि चर्चा करण्यासाठी राजेंद्रसिंह बीड येथे आले होते. श्रीमती मुधोळ-मुंडे यांनीही या सुचनांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मकता दाखविली.यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी शासन, प्रशासन व मानवलोकच्या वतीने मांजरा नदी परिक्रमा करण्यात आली. राज्यातील बीडसह तीन जिल्ह्यांतून वाहणार्या नदीपरिक्रमेतून समोर आलेले मुद्दे व त्यावरील उपाय योजनांचा अहवाल त्यांनी दिपा मुधोळ-मुंडे यांना सादर केला. देशात जल आणि वायुचे प्रचंड प्रमाणात प्रदुर्षण झाले आहे. यामुळे दुष्काळी,अवकाळीचे संकट वारंवार येत आहे. यासाठी गावागावांत जल साक्षरता वाढविण्याची गरज असून यामध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळ दूर करायचा असेल तर वृक्ष लागवड आवश्यक आहे. ज्यावेळी उघड्या जमिनीवर थेट सुर्याची किरणे पडतात, त्यावेळी ती जमीन तापते. यामुळे हवाही गरम होवून ढग उंच जातात. परिणामी पाऊस पडत नाही, पडला तर अती प्रमाणात पडतो. हे दुष्काळाचे- अतिवृष्टीचे चक्र संपवायचे असेल तर वृक्षलागवड करावी लागेल. बीडसह मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासनाबरोबरच समाजानेही पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही राजेंद्रसिंह राणा म्हणाले,
शेतर्यांनी वॉटरबँक सुद्धा तयार करायला हवी. यामुळे एखादवेळी पावसाने ओढ दिली तर किमान पिकांना पाणी देता येऊ शकेल. या दिशेने काम करण्यासाठी शासनाबरोबरच सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. बीडमध्ये मानवलोकच्या माध्यमातून जलसाक्षरतेचे काम सुरु असून त्याचाही उपयोग बीडच्या दुष्काळमुक्तीसाठी होईल असे राजेंद्रसिंह म्हणाले.यावेळी जलबिरादरीचे नरेंद्र चुग म्हणाले, मराठवाड्याला टँकरवाडा म्हणतात, ही ओळख पुसून टाकण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक आहे. योग्य त्या ठिकाणी पाणी अडवण्याबरोबरच जुन्या सिमेंट नाला बांध, बंर्धायांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. यामुळे त्यांची जलसाठ्याची क्षमता पुर्वपदावर येऊ शकेल. ही सर्व कामे कोणा एकाच्या माध्यमातून होऊ शकणार नाहीत तर आपण सर्वांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही चुग यांनी सांगितले. यावेळी मानवलोकचे अनिकेत लोहिया, युवाग्रामचे एच.पी.देशमुख उपस्थित होते.
हे सुचविले दुष्काळमुक्तीचे उपाय
नद्यांवरील अतिक्रमणे हटवून हद्दनिश्चित करावी.जुन्या बंधार्यांची दुरुस्ती,केटीवेअर बंधार्यांना दरवाजे बसावेत.नद्या-ओढ्यांत येणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा शेतीसाठी वापर करावा.वनीकरण वाढविले तर दुरगामी फायदा.या कामांत समाज, सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवावा.सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे.सामुदायिक जलपुनर्भरण गरजेचे.पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न करणे.
आता बोभाटी नदी परिक्रमा
मांजरा नदी परिक्रमेनंतर आता जिल्ह्यात बोभाटी नदी परिक्रमा लवकरच सुरु होणार आहे. युवा ग्रामने यासाठी पुढाकार घेतल्याचे एच.पी. देशमुख यांनी सांगीतले. विडा (ता. केज) या नदीचे उगम असलेल्या ठिकाणापासून याची सुरुवात होणार आहे.
Leave a comment