बीड | वार्ताहर
दोन दिवसापूर्वी पुण्याहून परभणीला आलेला एक तरूण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान या रूग्णाने परभणीला जाण्यासाठी बीड जिल्ह्यातून प्रवास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मातोरी चेक नाक्यावरील बारा जण त्याच्या संपर्कात आल्याचे समोर आले. आरोग्य विभागाने या सर्वांचा शोध घेत त्यांना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
परभणी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाने बीड जिल्ह्यातून प्रवास केला. मातोरी चेक नाक्यावरील पोलीस अधिकारी, काही कर्मचारी तसेच आरोग्य, कृषी व शिक्षण विभागाच्या कर्मचार्यांसह दोन ग्रामस्थ असे एकुण बारा लोक रूग्णाच्या संपकात आले होते. त्या सर्वांना जिल्हा रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल केले गेले आहे. दरम्यान आज शुक्रवारी (दि.17) त्या सर्वांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे आढावा घेत आहेत.
Leave a comment