नेकनुर/ मनोज गव्हाणे
वीस हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या नेकनुरात एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने शिवाय याच बँकेवर आसपासच्या वीस गावांचा व्यवहार असल्याने नेहमीच गर्दी असलेल्या या बँकेच्या समोर सकाळी सहा वाजल्यापासून रांगा पाहायला मिळतात यामुळे वृद्ध, पेन्शनर, निराधार, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्वीची एसबीएच आणि आता ची एसबीआय याच एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत वीस हजाराच्या लोकसंख्या असलेल्या नेकनूरसह
वीस खेड्यांचा भार आहे. शाखेत कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या त्यामुळे पूर्वीपासूनच येथील शाखेत व्यवहार करण्यासाठी येणाऱ्यांना तास_ दोन तास प्रतीक्षा असायची आता तर लॉकडाऊनमुळे शाखेची वेळ सकाळी सात ते साडेनऊ असल्याने लोकांना सकाळी सहा वाजल्यापासूनच बँकेच्या दारात सोशल डिस्टन्स ठेवत रांग लावावी लागत आहे. यातच काहींचे काम एका दिवशी होईल याची शाश्वती नसल्याने अनेकांची हेळसांड होत असून विशेषतः निराधार, वृद्ध, पेन्शनर, महिला अडचणीत आहेत. याच शाखेत नोकरवर्गाचे पगार, व्यवसाय व्यवहार आहेत यातच जनधन आणि पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचे पैसे खात्यावर आल्याने गर्दीत मोठी वाढ झाल्याचे चित्र असून सकाळीच पडणारा उन्हाचा चटका अनेकांची घालमेल करीत आहे. रस्त्यावर दूरपर्यंत रांगा लागत आहेत बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी होत आहे.

ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Leave a comment