बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील पांगरा येथील जि.प.प्रा.शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळताना एकाच पदावरुन अधिक शिक्षकांचे वेतन अदा करणे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेशिवाय शालेय अनुदान खर्च करणार्या एका सहशिक्षकाला जि.प.सेवेतून निलंबित करण्यात आले. गुरुवारी (दि.16) मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी हे आदेश दिले.
अंबादास गहिनीनाथ सिरसट असे कारवाई झालेल्या सहशिक्षकाचे नाव आहे. ते पांगरा (ता.आष्टी) जि.प.प्रा.शाळेत कार्यरत होते. त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार असताना त्यांनी एकाच पदावरुन जास्त शिक्षकांचे वेतन दिले. शिवाय अनुदान खर्च करताना कोटेशन न मागविता साहित्य खरेदी केली, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेशिवाय शालेय अनुदान खर्च केला गेला.हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधिताला कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा मागविला होता, मात्र हा खुलासा असमाधानकारक असल्याने सीईओंनी गुरुवारी सहशिक्षकास सेवेतून निलंबित केले आहे.
Leave a comment