आयुष्यभर चंद्राप्रमाणे शितल प्रकाश देऊन समाजातील तळागाळातील दीन दलितांना आधार व दिशा देणारे आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ पितृतुल्य 'कै.खारके आण्णा' यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा लेख लिहिताना मन अगदी भरून येत आहे.
प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात प्रेरणास्रोत असल्याशिवाय कार्य पूर्णत्वास जात नाही." गुरुवीण कोण दाखविल वाट!." त्याप्रमाणे आयुष्यात गुरूचे स्थान अद्वितीय असते. माझ्या आयुष्यात हा सुवर्ण योग घडून आला. दुर्दम्य आशावाद आणि विचारात परखडपणा , आचारात सात्विकपणा व उच्चारात विवेकता अशा बहुविध गुणांचा अजोड संगम म्हणजे आमचे तिर्थरूप 'आण्णा!' आणि त्यांच्यामुळे मला समाजात जाऊन प्रेरणास्रोत शोधण्याची गरजच भासलीच नाही. विद्यार्थ्यावर संस्कार कसे करावेत?...समाजात आपली भूमिका काय असावी?.. आणि महत्वाचे म्हणजे,उत्तम माणूस कसा घडवावा?..हे फक्त आण्णा कडूनच शिकायला मिळाले आणि त्यातूनच एका नवीन विचार पर्वाला सुरूवात झाली.असं मला आदर्शवादी मानवता वादाचे जीवंत उदाहरण समोर वाटले आणि अनुभवले.
प्रत्येक व्यक्तीमध्ये मोह, मत्सर, मी..पणा, अंहकार इ.भोगवृत्ती यांचा अंतर्भाव असतो. पण आण्णांचे समाजकार्यात आपले मोलाचे योगदान असतानाही या व्यक्तीनेने कोणत्याही प्रकारच्या फळाची किंवा परताव्याची अपेक्षा न करता आपले कार्य अखंडीत चालू ठेवले. कसल्याही प्रसिद्धीची लालसा न ठेवता आपल्या ज्ञानरूपी दिव्याने समाजातील अंधःकार दूर करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला.अशा 'कर्मिक- सत्पुरुषाच्या' विचारांचे संक्रमण येणाऱ्या पिढीला व्हावे, आण्णांच्या विचारांचा आदर्श तरुण वर्गाने घ्यावा व त्यातूनच एक आदर्श पिढी व प्रेरणादायी भारत निर्माण व्हावा,त्यासाठी ह्या लेखाचा आदर्शवादी वारसा पुढील पिढीस तेजोमय करण्यासाठी लिहिण्याचा अट्टहास केला आहे,एवढंच मी म्हणेन!
जेंव्हा जेंव्हा आपण सत्पुरुषाचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्या असे लक्षात येते की , प्रत्येक सतपुरुषाला कठिण परिस्थिचा सामना करीत आपल्या स्वतःचा इतिहास निर्माण करावा लागतो .त्याचप्रमाणे आण्णांचा भूतकाळही परिस्थितीचा सामना करीत साकारल्याचे दिसून येते. आण्णांचा जन्म 'नेकनूर' नगरीत १४ एप्रिल १९३७ साली झाला. वसंत ऋतुतील हा जन्मलेला वसंत. बालपणी बहरत होता. परंतु बालपणीच मायेच छत्र हरवले आणि खऱ्या अर्थाने परिस्थितीशी झगडण्याचे सामर्थ्य आण्णांमध्ये तेंव्हापासून निर्माण झाले. बिकट परिस्थितीला सामोरे जात बालपणी शिक्षणाचे धडे गिरवायला सुरवात केली .जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे यशाचे गमकसुत्र अण्णांना बालपणीच उमगले होते असं म्हणावे लागेल आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यावरही त्या काळी समाधानी न राहता सन १९५९ साली आणांनी 'डी.एड्.' पदविका पुर्ण केली व त्याच वर्षी 'गंगामसला' या ठिकाणी शिक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले व खऱ्या अर्थाने आण्णांच्या शैक्षणिक क्रांतीला प्रारंभ झाला.आपल्या अद्वितीय कार्यामुळे व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे शासनाने आण्णांना सन १९९१ साली अतिरिक्त वेतनवाढ देऊन सन्मानित केले व आण्णांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने शासनाने गौरव केला.
आण्णांना कोणत्याही प्रकारची कौटुंबिक आधाराची पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच असं वैचारिक विश्व निर्माण केल. कुटूंबातील जबाबदारी सांभाळत आण्णांनी जनमाणसात आपल्या विचाराने तेजोवलय निर्माण केले व त्यातूनच 'आण्णा' एक 'आगळ-वेगळं'(अद्वितीय) व्यक्तीमत्व म्हणून थोड्याच काळात परिचित झाले. 'आई ही घराचं मांगल्य!' तर वडिल हे 'घराच आस्तीत्व!'असते. या विचारात जोड देत आण्णा जेंव्हा समIज कार्यासाठी बाहेर असायचे तेंव्हा आपल्या मुलांवरील संस्काराची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी,त्याची पत्नी आणि आमची 'आईमाता! 'त्यांचा सुद्धा आवर्जुन या ठिकाणी उल्लेख करावा लागेल कारण पत्नीची समर्थ-साथ असल्याशिवाय आण्णा एवढे आद्वितीय कार्य करू शकले नसते.
आण्णांच्या संपूर्ण कारकीर्दीत आण्णांना बरेच 'चांगले-वाईट' अनुभव आले आपल्या संपूर्ण शैक्षणिक कार्याच्या आयुष्यात शाळेत शिकवत असताना दिव्यांग जे की,'कर्णबधिर,अस्थिव्यंग तसेच अनाथ, निराधार, निराश्रीत मुलांच्या करिता मदतीचा हात देण्याची कल्पना आण्णांच्या मनात येत असत. फार पुर्वीपासूनच आपल्या कर्तव्य सक्षम असलेल्या मुलांना ते बोलून दाखवत असत.परंतु खऱ्या अर्थाने आण्णांच्या स्वप्नांना आकार देत. सन २००६ साली प्रत्यक्षात प्राप्त झाला. दिव्यांग मुलांना समाजात मानाचे स्थान मिळावे, या विशेष मुलांनाही 'ज्ञान-प्रवाहात' खऱ्या अर्थाने समाविष्ट करता यावे यासाठी सन २००६ साली आण्णांच्या प्रेरणेने मायेच छत्र साकारण्यात त्यांना आपल्या मुलांच्या साहाय्याने यश आले.कर्णबधिर मुलांसाठी शासनमान्य अनुदानित तत्वावर 'मूकबधिर निवासी शाळा' सर्वप्रथम सुरु केली. त्याचक्षणी आण्णांच्या आयुष्यातील तो सर्वात अविस्मरणीय क्षण होता असं मला वाटतं . आण्णांच्या चेहऱ्यावरील तो तो आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.
अल्पवधीतच कर्णबधिर मुलांच्या निवासी शाळेने क्रीडाक्षेत्र,कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम,कर्णबधिरांसाठी राज्यस्तरीय वाचा-लेखन कौशल्य स्पर्धा, इत्यादीत मिळवलेले नेत्रदिपक यश, पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात पटलेली खात्री! आणि त्यातूनच निर्माण झालेले कौटुंबीक जिव्हाळ्याचे नातेसंबंध आणि मानवतावाद साकारण्यात साकारलेले यश! हे सर्व बरंच काही सांगून जातं. आणि पुढे त्याच प्रेरणेतूनच सन २००८ साली 'आस्थिव्यंग निवासी विद्यालय' स्थापन केले व आण्णांनी समाजातील दिव्यांग मुलांना सुद्धा मायेच आणि हक्काच छत्र निर्माण केल. या सर्व कार्याची दखल समाज घेत होता.आणि आणांनी साकारलेल्या आधारविश्वाचं कौतुक समाजाकडून झाल. आण्णांना सन २०११ साली नेकनूर पत्रकार संघामार्फत 'जीवन गौरव' पुरस्कार मिळाला. त्यातुनच आण्णांचे समग्र जीवन एक आदर्शमयी , बहुआयामी , विविध पैलुंनी साकारलेले आपणा सर्वांना दिसून येईल. त्यावरूनच आण्णांचा जीवन प्रवास एखादया दिपस्तभांप्रमाणे इतरांना नेहमी मार्गदर्शक असा आहे. अगदी कोणत्याही संकटांच्या वेळी त्यांचा आधार घ्यावासा असे प्रत्येक दुःखात असलेल्या व्यक्तीला वाटत होता. सर्वगुणसंपन्न विचारांचा 'महामेरू' म्हणजे 'आण्णा!' होय.
आण्णांच्या आयुष्यातील प्रत्येक चढउतार, त्यांच्या आठवणी, अडचणींतून साकारलेले आण्णा , कर्तव्य कठोर आण्णा, परिश्रमी आण्णा अशा अनेकविध गुणांचा समुच्चय हे आण्णांच्या कार्यातून दिसून येते. आण्णांवर भरभरून प्रेम करणारे जीवलग मित्र, आण्णांचे हजारो शिष्यगण,अनेक जिवापाड प्रेम करणारे समाजातील घटक आण्णांच्या विचारप्रवाहात जे-जे आले त्यांना आण्णा समजले आणि उमगले. आज कितीतरी आण्णांचे विद्यार्थी हे मोठं मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत..,तर काही यशस्वी उद्योजक बनले आहेत...!
अशा या महान,आदरणीय नेतृत्वाचा शेवट ऐवढ्या लवकर होईल असे आम्हा कोणालाही साधी कल्पनाही करवत नाही..,परंतु मनुष्याचे जन्म आणि मरण अटळ आहे. आण्णांचे दुःखद निधन दि. 07/12/201रोजी झाले.या त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या 'कर्मयोगी' नेकनूरकरांनी गमावला.आण्णांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन...!
लेखन: भोंडवे सुनिल यशवंतराव
मुख्याध्यापक
अस्थिव्यंग निवासी विद्यालय, नेकनूर. ता.जि. बीड.
Leave a comment