खरीप पीक कर्ज वाटपाला बँकाचा खोडा!
जुने नवे करण्यावर भर;नव्याने कर्ज देण्यास टाळाटाळ
जिल्ह्यात केवळ 2304 शेतकर्यांना 157 कोटींचे पीककर्ज
बीड । सुशील देशमुख
बीड जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी प्रशासनाने डीसीसीसह राष्ट्रीयकृत बँकांना 1600 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. असे असताना बहुतांश बँकांकडून नियमाला खो देवून केवळ जुने कर्ज नवे करण्यावर भर दिला जात असून नव्याने पीक कर्ज मागणीसाठी गेलेल्या व जे शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाहीत त्यांना मात्र ‘आरएसी’ची परवानगी बंधनकारक करत कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज जिल्ह्यातील खरिपाचा आढावा घेण्यासाठी बीडमध्ये येत आहेत. अजितदादा, आपण आलाच आहात, तर नियमित व नवीन कर्जदार जे की, कर्जमाफीत नाहीत त्यांना कर्ज देण्यास बँका का टाळाटाळ करत आहेत, याचा अधिकार्यांना जाब विचाराच,अन् शेतकर्यांना न्याय द्या अशी विनवणी शेतकर्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाची स्थिती अतिशय कमी आहे. या हंगामात 15 जूनपर्यंत केवळ 9.85 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकर्यांना तीन लाख रुपये बिनव्याजी कर्जाची घोषणा केली आहे. मात्र बीड जिल्ह्यात दरवर्षी दिले जाते, तितके पीककर्ज देण्यासही बँका आखडता हात घेवू लागल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व बँकांना मिळून 1600 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे, आतापर्यंत मात्र 23 हजार 34 शेतकर्यांना 157 कोटी 65 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. दरम्यान कोटक महिंद्रा या राष्ट्रीयकृत बँकेने जिल्ह्यात 1 रुपयाचेही कर्ज वितरित केलेले नाही.
कोरोना संसर्गाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्याने खरीप पेरणीच्या तयारीत आहे. पण याच वेळी आता बँकांनी पीक कर्जासाठी शेतकर्यांना आडकाठी घातल्याचे वाटप आकड्यांवरुन दिसते. एप्रिल महिन्यात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले, असे असले तरी पीक कर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतला आहे. तीन बँकांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दहा टक्क्यांनू अधिक आहे. तर, दहा बँकांनी अद्याप पाच टक्केही वाटप केले नाही. एकूण वाटपाची टक्केवारी केवळ 9.85 टक्के आहे.दरम्यान, आरबीएल बँकेने केवळ 62 शेतकर्यांना दोन कोटी 84 लाखांचे वाटप केले आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाने 87 हजार तर ग्रामीण बँकेने 72 हजार रुपये प्रत्येक शेतकर्याला सरासरी वाटप केले आहे. उद्दीष्टपूर्तीसाठी मागच्या वर्षीच्या वाटपाचे आकडेही बँकेने यंदाच्या आकड्यांत मिसळले आहेत. मर्यादीत ग्राहक असल्याने सक्षम शेतकर्यांना पीक कर्ज वाटप केल्याचे शाखा व्यवस्थापकांनी म्हटले आहे. अशी सारी जिल्ह्यातील पीक कर्जाची स्थिती आहे. उपमुख्यमंत्री आज खरीप हंगामासंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काही करा पण, बँकांना पीककर्ज तातडीने द्यायला सांगा, अशा भावना शेतकर्यांनी व्यक्त केल्या आहेत.
नियमित कर्ज भरणार्यांना हेलपाटे!
जिल्ह्यात सध्या पीक कर्ज वाटप सुरु असले तरी जुन्या व कर्जमाफी योजनेतील कर्जदार शेतकर्यांना बँक शाखा पातळीवर तात्काळ कर्ज वितरित करत आहेत, पण जे नियमित व नवीन कर्जदार आहेत, परंतु कर्जमाफी योजनेत नव्हते त्यांना मात्र बीड ‘आरएसी’ परवानगी आणा, तरच कर्ज देवू असे कारण सांगत टाळाटाळ केली जात आहे. त्यात पुन्हा हा कर्ज मागणी प्रस्ताव जिल्हास्तरावर गेला की, तो मंजुर होवून येईल की नाही याची शाश्वती नाही. शिवाय ग्रामीण भागातील शाखाधिकारी ‘बीडहून फाईल आल्याशिवाय मी कर्ज वाटप करु शकत नाही’ असे सांगून मोकळे होत आहेत. अशी सारी दादा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची स्थिती आहे, हे म्हणजे कर्ज न भरणार्यांना माफ करायचे अन् नियमित कर्ज भरणार्यांना मात्र हेलमाटे मारायला लावायचे असेच धोरण बँक अधिकार्यांनी अवलंबिले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत दादा यावर निर्णय झालाच पाहिजे अशा भावना जिल्ह्यातील शेतकर्यांनी व्यक्त केल्या आहेत.
जिल्ह्यात 36 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित!
महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. पंरतु जिल्ह्यात अजुनही 36 हजार शेतकरी 36 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच आहेत. आता ही माफी कधी होणार याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. यासाठी तीन लाख तीन हजार 925 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी दोन लाख 67 हजार 945 शेतकर्यांना 1494 कोटी 63 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम भेटली आहे. मात्र, अद्यापही 35 हजार 988 पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.
Leave a comment