नवी दिल्लीः केंद्र सरकारने काही निर्बंधांसह ग्रामीण भागातील बांधकामांना परवानगी दिली आहे. जिथे हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोन नाहीए अशाच ठिकाणी इमारतींच्या बांधकामांना परवानगी देण्यात आलीय. २० एप्रिलपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने ही परवानगी दिलीय. केंद्र सरकारच्या निर्णयाचं राष्ट्रीय घरबांधणी विकास समितीचे (NAREDCO)अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी स्वागत केलं आहे.
देशात सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असली तरी बंद पडलेली बांधकामे काही अटींवर सुरू करण्याची परवानगी गृहमंत्रालयाने देऊ केली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. अशा कामाला प्रारंभ करण्यासाठी आवश्यक ती जमवाजमव करणे आणि २० एप्रिलपासून ती सुरू करण्याच्या या सूचना आहेत. अर्थात असे करण्यासाठी आवश्यक ती परवानगी आणि अटींची पूर्तता आवश्यक आहे. आम्ही या सकारात्मक निर्णयाचे स्वागत करतो, असं निरंजन हिरानंदानी यांनी म्हटलंय.
अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने कार्यरत करणे यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. तसेच यामुळे स्थलांतरित कामगारांचा प्रश्नही काही प्रमाणात सुटेल. त्यांच्या रोजीरोटीची समस्या दूर होईल आणि संभाव्य कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही सुटेल. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या मानवी आणि आर्थिक समस्यांना आपण सामोरे जात आहोत, त्या परिस्थितीत विविध क्षेत्रातील कामाला हळूहळू प्रारंभ करण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरेल, असं हिरानंदानी यांनी सांगितलं.
Leave a comment