मुंबई । वार्ताहर
ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोचविण्याच्या प्रश्र्नांवर पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत. कामगारांना घरी पोचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असतांना विलंब होत असल्याने झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल करत कामगारांचा संयम सुटू देऊ नका, लवकर निर्णय घ्या असे ट्विट त्यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्र्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली आहे. परंतु निर्णयास विलंब होत असल्याने पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत. यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी ’ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या, त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी पंधरा दिवस आहेत. जे ठणठणीत आहेत ते ही आजारी पडतील पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहेत. आज एक दोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जवाबदार?? रॅडम टेस्ट करा हवं तर पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा, ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील..त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत. एकही साधा शिंकला नाही मग काय चिंता आहे?..त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य?? आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा, हा विषय राज्याच्या अधिकारात आहे.’ असे म्हटले आहे.
Leave a comment