अंबाजोगाई । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन मुळे गोरगरिबांना अन्नधान्याची वानवा जाणवू यासाठी तातडीने आणि नियमाप्रमाणे धान्य वाटप करण्याचे निर्देश आहेत. असे असतानाही धान्यवाटपात अनियमितता करणार्या कांगणेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी निलंबित केला आहे.
लक्ष्मण गंगाराम कांगणे असे त्या स्वस्त धान्य दुकान परवाना धारकाचे नाव आहे. कांगणेवाडी सह धास्वडी येथील पर्यायी व्यवस्था या दुकानातून करण्यात आली होती. मात्र, या दुकानातून कार्ड धारकास पाच किलो ऐवजी तीन किलो धान्य देण्यात येत असल्याची तक्रार धसवाडी येथील काही ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष रुईकर यांच्याकडे केली होती. याप्रकरणाची चौकशी नायब तहसीलदारांच्या मार्फत करण्यात आली. चौकशी दरम्यान सदरील दुकानात अनियमितता आढळून आल्याने त्याच्या विरोधात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमान्वये कार्यवाही करण्याचा प्रस्ताव अंबाजोगाई तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे सादर केला होता. त्यानुसार परवाना धारक लक्ष्मण कांगणे याने कार्डधारकांना योग्य प्रमाणात धान्य वितरण न करून शासन निर्णयातील तरतुदीचा भंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी मंगळवारी सदरील दुकानाचा परवाना निलंबित केला.
Leave a comment