कोरोनाच्या उपचारासाठी सर्वसामान्य झाले कर्जबाजारी!
बीड । वार्ताहर
कोरोना संसर्गामध्ये गतवर्षी भावना आणि व्यवहार यांचा संगम दिसून आला होता. अनेक ठिकाणी गोरगरिब आणि सर्वसामान्य रुग्णांना समाजातून आणि रुग्णालयातूनदेखील आर्थिक मदत केली जात होती, मात्र या दुसर्या लाटेत कोरोना विषाणूने सर्वत्रच थैमान माजवलेले असताना रुग्णालयातील फीस आणि औषधांचा खर्च चारपटपेक्षाही जास्त झाला आहे. सीटीस्कॅन, रुग्णालयाचे भाडे, रेमडेसिवीर व न्युमोनियाच्या इतर औषधापचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने कोरोनाग्रस्त कुटूंबियांना आपली मालमत्ता विकण्याची वेळ आली आहे. मेडिक्लेम असणार्यांना फायदा होत असला तरी सर्वसामान्य लोकांना मात्र घरदार विकण्याची वेळ या कोरोनाने आणली आहे. बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागात आणि मोठ्या शहरातदेखील अनेकांनी आपली घरे, दुकानाचे गाळे विकल्याची उदाहरणे समोर येत आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. लॉकडाऊन सुरु असल्याने कामे बंद आहेत. व्यवहार बंद आहेत. हातावर पोट असणार्यांची रोजीरोटी बंद आहे. शेतीमधील कामे देखील बंद आहेत. त्यामुळे चलन फिरायचे तरी कसे? वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या कामगारांवर तर आर्थिक बरोबरच उपासमारीचेही संकट ओढवले आहे. लहान-लहान व्यवसायिक , हातगाडेवाले आणि भाड्याच्या दुकानामध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील. या सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे व्यवसाय नाही, दुसरीकडे भाडे मात्र भरावे लागते. लाईट बील भरावेच लागते. मोबाइल रिचार्ज करावेच लागते. व्यवहार बंद असले तरी वाहनांमध्ये पेट्रोलसाठी पैसेच मोजावे लागतात. याशिवाय घरखर्च, इतर आजारांचा औषधोपचार, ज्याच्या घरात लहान मुले शाळा-महाविद्यालयात जाणारे असतील त्या पालकांनादेखील शाळा-महाविद्यालय आणि शिकवणीच्या फीसचा आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात बसला आहे. यातच एखाद्या कुटुंबातील सदस्याला कोरोना झाला तर त्या कुटूंबाची अवस्था दयनीय होते. आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 2 लाखांपेक्षा जास्त बील होते. सर्वसामान्य लक्षणे असणार्या रुग्णांना तितका खर्च येत नाही. जिल्हा रुग्णालयाच जीव वाचेल की नाही? याची शाश्वती नसल्याने गंभीर आणि मोठा स्कोअर असलेले रुग्ण खासगी रुग्णालयात जाण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र या रुग्णालयात सर्व्हीस चार्जपासून तर औषधोपचारांपर्यंत वेगवेगळे खर्च पाहिले तर डोळे फिरतात. लॅब, विविध चाचण्या, रुमचे भाडे, डॉक्टरांच्या भेटी, रेमडेसिवीरचे पैसे याशिवाय सीटीस्कॅन व इतर काही महत्वाच्या चाचण्या कराव्या लागल्या तर हजारो रुपये कसे निघून जातात हे कळतही नाही. दुसर्या लाटेत तर ऑक्सीजनवर असलेला रुग्ण वाचेल की नाही याची भीती आता लोकांना वाटू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयात आठ ते दहा दिवस राहून पुन्हा घरी पंधरा दिवस विलगीकरण करुन राहिले तर परवडते, असा सार्वत्रिक अनुभव असल्याने मध्यमवर्गीय कुटूंबासमोर पैशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कुटूंबानी आपल्याकडे असलेली जागा, असलेले वाहने, सोने-नाणे विकून दवाखान्यांची भरती केली आहे. याचा परिणाम आता भविष्यात पुन्हा मुलांच्या शिक्षणावर होणार आहे. पैसाच नाही तर मुलांना शिकवायचे कोठून? असा विचार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनुभवण्यास मिळणार आहे. दुसर्या लाटेमध्ये ग्रामीण भागात अनेकांनी आपली शेत जमिन गहाण ठेवल्याचीही उदाहरणे आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत आष्टी, गेवराई आणि बीड तालुक्यासह माजलगाव, परळीमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी मृत्यूदर कमी होता आणि दवाखान्यात बेडही उपलब्ध होते. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ म्हणून तालुक्यातील काही डॉक्टरांनी स्वत:ला रुग्णसेवेत वाहून घेतले. मात्र काही खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण तपासणी बंद करून दवाखान्यात आलेल्या रुग्णास औरंगाबाद किंवा पुणे येथे जाण्याचा सल्ला देत होते.मात्र आता कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. खेडोपाडी, वाडी-वस्तीवर रुग्ण सापडू लागले. परिणामी शासकीय आरोग्य सेवा कमी पडू लागल्याने खासगी डॉक्टरांवर भार पडला. पहिल्या लाटेत सुविधा दिलेल्या डॉक्टरांनी ऑक्सिजनची आवश्यकता ध्यानात घेऊन रुग्णालय अद्ययावत करून घेतले. शासकीय दवाखान्यातही याबाबतची सुविधा उपलब्ध करण्यात आली.सौम्य लक्षणे असणार्या रुग्णांसाठी तालुकास्तरावर आणि ग्रामीण भागातही विलगीकरण कक्ष नव्याने चालू केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पहिल्या लाटेत अलिप्त असलेल्या काही डॉक्टरांनी पैसे कमावण्याचा हेतू ठेवून कोविड केअर सेंटर सुरू केले. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता त्यांनी केली किंवा नाही, हा प्रश्न आहेच; परंतु रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी ते अनामत म्हणून लाखो रुपये घेत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. अत्यवस्थ रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन व प्लाझ्माची आवश्यकता भासत असल्याने सोयी-सुविधांचा विचार करून पैशापेक्षा माणूस जगला पाहिजे या भावनेने नातेवाईक अशा सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करतात. त्यांच्याकडेही पर्याय नसल्याचे हेरून दवाखान्यांकडून भरमसाठ बिले केली जात आहेत.
खासगी रुग्णालयांकडून पिळवणूक
एकदा रुग्ण दवाखान्यात दाखल झाला की, दवाखान्याकडून बिलाचे मीटर सुरू होते. त्याचा वेग उपचाराच्या काही पट असतो, असे त्रस्त नागरिक सांगत आहेत. आवश्यकता नसतानाही रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करून खासगी दवाखान्यातून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक केली जात आहे. साखळी पद्धतीचा अवलंब करून वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी सांगत लूट सुरू होते. काही प्रश्न केला तर ‘तुमचा रुग्ण दुसरीकडे हलवा’ असे सांगून अप्रत्यक्षपणे धमकावले जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव सर्व प्रकार सहन करावा लागत असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत.
आर्थिक लुट करणार्या रुग्णालयांवर कारवाई होणार का?
जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था व बँकांमधून शेतकर्यांनी यापूर्वीच पीककर्ज, स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतलेले आहे. तेच कर्ज कुठे फिटत नाही तर कोरोनामुळे पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत शेती गहाण ठेवणे किंवा विकण्याशिवाय शेतकर्यांकडे पर्याय उरला नाही. शासनाने याची दखल घेऊन अवाच्या सवा बिले आकारणार्या डॉक्टरांविरोधात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.खासगी कोविड केअर सेंटर चालवणार्यासर्व दवाखान्यांचे ऑडिट केले जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकात ऑडिटरची नेमणूक केली आहे. खासगी कोविड केअर सेंटरमधून जादा बिल आकारले गेले होते. त्यांची चौकशी झाली मात्र त्यांच्यावर कारवाई कधी होणार ? याकडेही रुग्णांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment