पाच हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात
वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांचे रॅकेट
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना संसर्गामध्ये एकीकडे अख्खे कुटुंबच उध्वस्थ होत असताना आणि कोरोना संसर्गाने हैराण झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याऐवजी गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्रच रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट सुरु असून बीड जिल्हा रुग्णालय तसेच अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात रुग्णांना बेड मिळवण्यासाठी चक्क बोली लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जिल्हा रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी कर्मचारी आणि रुग्णाच्या नातेवाईकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून हा प्रकार थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांच्यापर्यंत जावूनही त्यांनी साधी चौकशीही केली नाही. बेडच्या बोलीला त्यांची संमती आहे काय? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड मिळणे अशक्य होवून बसले आहे. कधी-कधी दोन-दोन दिवस रुग्णांना बेड मिळत नाही. जिल्हा रुग्णालयातील सस्पेक्ट वार्डमध्ये किंवा वर्हांड्यामध्ये खाली झोपून रहावे लागते. अशावेळी आपल्या रुग्णाला बेड मिळावा यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धडपड चालू असते, त्यातच एखाद्या रुग्णाला त्रास होवू लागला तर त्याला तातडीने ऑक्सीजन बेड मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात; मात्र बेड शिल्लक नाही, असे सांगून मोकळे होण्याचे काम अधिकारी करतात, आपल्यासमोर आपला भाऊ, आई,वडिल बायको किंवा पती कोरोनाच्या त्रासाने तडफड करत असेल तर त्याला उपचार मिळवण्यासाठी कोणाचेही पाय धरण्याशिवाय नातेवाईकांना पर्याय राहत नाही. काही का होईना आपला माणूस वाचावा यासाठी ऐनवेळी वाट्टेल ते करायला नातेवाईक तयार होतात, आणि त्याचाच फायदा आता रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर, कर्मचारी घेवू लागले आहेत. रुग्णांना बेड देण्यासाठी चक्क बोली लावली जाते. यामध्ये ऑक्सीजन बेडसाठी दहा ते पंधरा हजार आणि व्हेंटिलेटर बेडसाठी चक्क 25 हजारांपर्यंत बोली लावली जात आहे.
सध्या जिल्ह्यात खासगी व सरकारी असे एकूण 152 कोव्हिड सेंटर व हॉस्पीटल आहेत. या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांसाठी 11 हजार 566 खाटांची क्षमता आहे. त्यापैकी 11 हजार 380 खाटा प्रशासनाकडून मंजूर झालेल्या आहेत. सध्या जिल्ह्यात 6 हजार 736 कोरोना बाधीत रूग्ण उपचार घेत आहेत.तर 4 हजार 951 खाटा शिल्लक आहेत. हा आकडा दररोज बदलतो. 1 हजार 721 सर्वसाधारण खाटा आहेत. हा आकडा दररोज बदलतो. जागेवर ऑक्सीजनची सुविधा असलेल्या 921 खाटा तर सिलेंडरव्दारे ऑक्सीजन पुरवठा केल्या जाणार्या खाटांची संख्या 661 इतकी आहे. जिल्ह्यात सध्या एकूण 253 आयसीयु खाटा आहेत. व्हेंटीलेंटर खाटांची संख्या 239 इतकी आहे. याबरोबरच ऑक्सीजनचे 728 जम्बो सिलिंडर आहेत.409 लहान सिलिंडर उपलब्ध आहेत.
खासगी रुग्णालयामध्ये तीन-चार लाख रुपये घालण्यापेक्षा जिल्हा रुग्णालयात 25-50 हजारात काम होणार असेल तर नातेवाईक त्यासाठीही तयार होत आहेत. बेड बरोबरच एखाद्या रुग्णाला तातडीने ऑक्सीजेन बेड बाजूला ठेवायचा असेल तर हजार-दोन हजार रुपये कर्मचार्यांना द्यावे लागतात. एका रुग्णाच्या नातेवाईकाने कर्मचार्याला बेडसाठी फोन केल्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्याने ऑक्सीजन बेडसाठी 15 हजारांची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ही क्लिप एका जबाबदार कर्मचार्याने जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनाही ऐकवली. मात्र त्यांनी या संदर्भात साधी चौकशी करण्याचीही तसदी घेतली नाही. कोरोना संकटात शासनाच्या रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड आणि हाल होत असताना नातेवाईकांची कशी आर्थिक लुट होत आहे याचे अनेक प्रकार गेल्या दोन महिन्यात बाहेर आहेत. त्याचा कसलाही परिणाम रुग्णालय प्रशासनावर झालेला नसून कर्तव्यदक्ष अधिकारी आणून रुग्णालयाचे व्यवस्थापन सुधारावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ऑक्सीजन बेडसाठी 15 हजार
व्हेंटिलेटरसाठी 25 हजार
जिल्हा रुग्णालयात बेडचे दर देखील ठरलेले असून साध्या बेडसाठी 5 हजार, ऑक्सीजन बेडसाठी 15 हजार तर व्हेंटिलेटर बेडसाठी 25 हजार रुपये लागतात, आणि ते पैसे थेट साहेबांपर्यंत जातात. त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही असा संवादच या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत असल्याने जिल्हा रुग्णालयात कसा नंगानाच सुरु आहे हेच स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकार्यांनी रुग्णालय दत्तक घ्यावे
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जसा पुढाकार घेतला आणि रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवला देखील. त्याचपध्दतीने आता रुग्णालयाचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी तेथील यंत्रणा एखाद्या उपजिल्हाधिकार्यांकडे द्यावी आणि सर्वसामान्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांकडूनच जिल्हाधिकार्यांनी रुग्णालय दत्तक घेण्याची मागणी केली जात आहे.
पिंपळनेरचा रुग्ण जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार
बेडसाठी 15 हजारांची मागणी ज्या रुग्णाच्या नातेवाईकाला करण्यात आली, तो रुग्ण पिंपळनेरचा असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येतही चांगली आहे. या संदर्भात रुग्णालयातून सुटी झाल्यावर या प्रकरणासंदर्भात स्वत: आपण जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले.
Leave a comment