लोकांना येवू लागली क्षीरसागरांची आठवण
बीड । वार्ताहर
प्रशासनावर वचक असणारा पालकमंत्री कोण? अशी चर्चा ज्यावेळी होते त्यावेळी सर्वप्रथम कोणीही जयदत्त क्षीरसागर यांचेच नाव घेईल. राजकारणात काहीही असो परंतु विकास कामे आणि प्रशासनातील अधिकार्यांकडून काम करुन घेण्याची लकब ही केवळ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातच आहे. दुष्काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाची आठवण आजही लोकांना आहे. आता कोरोना संकटात जयदत्त क्षीरसागर मंत्री असते तर जिल्ह्यातील यंत्रणा टाईट झाली असती, प्रशासन सतर्क राहिले असते. लोकांच्या अडचणी जागच्याजागी सुटल्या असत्या अशी भावना लोकांमध्ये व्यक्त होत असून गेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांना विरोध करणार्या लोकांनाही या संकटात जयदत्त क्षीरसागरांची आठवण येवू लागली आहे. बीडला कोणी वालीच राहिला नाही अशी भावना शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्व.गोपीनाथ मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर या दोघांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. भले गोपीनाथ मुंडे कधी जिल्ह्यात सत्तेत नव्हते, मात्र सत्तेत नसतानाही यंत्रणेवर त्यांचा असलेला वचक आणि काम करुन घेण्याची पध्दत यामुळे प्रश्न कुठलाही आणि कोणाचाही असो, तो मार्गीच लागायचा. त्याच पध्दतीने जयदत्त क्षीरसागर देखील प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करण्यात माहिर आहेत. या दोन्ही नेत्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे जिल्ह्यातील कुठल्याही गावातील लोक थेट येवून त्यांना भेटत, आणि आपली अडचण, समस्या सांगत असत. आता आमदार, मंत्री, पालकमंत्री भेटतच नाहीत, तर अडचण सांगायची कोणाला? हा खरा प्रश्न आहे. मूळातच प्रशासनाचा अभ्यास राजकारण करताना करावा लागतो. केवळ आणि केवळ राजकारणच करणार्या लोकप्रतिनिधींना प्रशासनातील बारकावे लवकर लक्षात येत नाहीत. जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री असताना जिल्ह्यात टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज मुंबईत पोहचत होता, हे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या काळात जाणवले नाही.स्व.विमलताई मुंदडा यांनी देखील पालकमंत्री असताना जिल्ह्यातील अधिकार्यांना विश्वासात घेवून काम केले. त्यामुळे पूर परिस्थिती, ओला दुष्काळ असो, यासारख्या संकटात त्यांनी चांगले काम केले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोन टर्म पालकमंत्री राहिले. त्यामुळे प्रशासनातील अधिकार्यांवर त्यांची पकड होती. अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना विश्वासात घेवून त्यांच्या अडचणी लक्षात घेवून त्यांच्याकडून काम कसे करुन घ्यायचे याचा परिपाठ जयदत्त क्षीरसागरांना पाठ असायचा. आता कोरोना संकटात ते जर मंत्री असते तर त्यांनी बीडमध्ये बसून प्रत्येक रुग्णाला मदत कशी मिळेल, आरोग्य आणि जिल्हा प्रशासनात काम करताना अधिकार्यांना येणार्या अडचणी कशा दूर करता येतील, लॉकडाऊनमध्ये व्यापारी आणि लहान व्यावसायिक यांचे प्रश्न कसे सोडवता येतील याचा त्यांनी बारकाईने अभ्यास करुन त्यावर मार्ग सूचवला असता. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. आता तर ऑक्सीजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना जीव मुठीत धरुन रुणालयात रहावे लागते. इकडे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि तिकडे जिल्हा रुग्णालयात कोणाचा कोणाला पायपोस नाही. कोणी कोणाचा मालक नाही, कर्मचार्यांना कोणाचा धाक नाही, त्यामुळे जिल्ह्याचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना जयदत्त क्षीरसागरांच्या नियोजनाची, त्यांच्या कर्तृत्व तत्परतेची आणि प्रश्न सोडवण्याच्या हातोटीची आठवण येवू लागली आहे.
रेमडेसिवीरसाठी सातत्याने पाठपुरावा
बीड जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून त्यांचे जीव वाचावेत यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले आहेत.यासाठी जालना जिल्हाधिकारी बिनवडे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. येत्या 24 तासात ते 1 हजार इंजेक्शन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे प्राप्त व्हावेत यासाठी देखील जयदत्त क्षीरसागर यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला काल यश आले. 1 हजार पैकी 900 इंजेक्शन प्रशासनाला प्राप्त झाले असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगीतले.
अप्पर जिल्हाधिकारी पाठक बेल्लारीमध्ये
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना लिक्विड ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्यासाठी जालन्याचे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे जबाबदारी टाकली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होवू लागला आहे. कर्नाटकमधील बेल्लारी येथून लिक्विड ऑक्सीजनचे दोन टँकर मराठवाड्यासाठी आणि नगर जिल्ह्यासाठी मिळणार आहेत. ते लवकरात-लवकर मिळावेत यासाठी अप्पर जिल्हाधिकारी पाठक हे थेट बेल्लारीत जावून धडकले आहेत. यातील ऑक्सीजन बीडलाही मिळणार आहे.
Leave a comment