मुंबई -
मुंबईतील वांद्रे आणि ठाण्यातील मुंब्रा येथे आज लॉकडाउनचा विरोध कऱण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. एकीकडे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे. स्थानिक न्यायालयात त्याला हजर केलं जाणार आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतीयांची गर्दी जमवण्यासाठी आवाहन करणाऱ्या विनय दुबे याला ऐरोली येथून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित केले होते. विनय दुबे याचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क असून तो उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे.
देशात बुधवारी संपणाऱ्या लॉकडाउनमध्ये वाढ झाल्याने संयम सुटलेल्या उत्तर भारतीय कामगारांनी मंगळवारी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर आपआपल्या गावाला जाण्यासाठी गर्दी केली. यामुळे प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्राने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत इतके दिवस राखलेले संयम सुटला की काय अशी शंका उपस्थित झाली . विशेष म्हणजे गाड्या सुरूही झाली नसताना शहरातील अंतर्गत वाहतूक बंद असतानाही ही गर्दी झाली कशी? या प्रश्नाचा शोध घेत असता पोलीस उत्तर भारतीय महापंचायत संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे पर्यंत पोहोचले. त्याने फेसबुकवर आंदोलनाची हाक दिली होती. उत्तर भारतात राहणाऱ्या व कामासाठी मुंबईत आलेल्या मजुरांना आपआपल्या राज्यात पाठवण्यासाठी आंदोलन छेडणे, १८ तारखेला एकत्र जमण्याचे आवाहन करणे, आदी त्याच्यावर आरोप असून फेसबुक लाईव्हवर त्याने ही भूमिका मांडली असल्याचे समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली. अफवा पसरवणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, नागरिकांना एकत्र जमवणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बाबत अधिक माहिती देताना उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की दुबे याच्याबाबत माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

15
Apr
Leave a comment