मुंबई:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला. मात्र, त्याच्या अगदी काही तासांमध्येच म्हणजे दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुंबईच्या वांद्रे पश्चिममध्ये हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर जमा झाले. जामा मशिदीच्या समोर हे सर्व मजूर एकत्र आले आणि त्यांनी ‘आम्हाला आमच्या राज्यात आमच्या घरी जाण्याची परवानगी द्या’, अशी मागणी करायला सुरुवात केली. मोठ्या प्रयत्नांनंतर पोलिसांना या सगळ्यांना माघारी पाठवण्यात यश आलं. पण हे सगळे मजूर अचानक का आणि कसे जमा झाले? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. खरंतर रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आलेलं एक पत्र आणि त्या पत्राच्या आधारावर एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेली एक बातमी यासाठी कारणीभूत ठरली होती असं आता समोर येऊ लागलं आहे.
काय आहे हे पत्र?
वांद्र्यामध्ये ते शेकडो मजूर जमा होण्याआधी सकाळी रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाच्या सिकंदराबादमधल्या कार्यालयातून १३ एप्रिल रोजी एक पत्र जारी करण्यात आलं होतं. या पत्रानुसार देशाच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी जनसाधारण स्पेशल नावाची ट्रेन चालवण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी सर्व डिविजनकडून त्या त्या भागामध्ये अडकलेल्या मजुरांची आकडेवारी मागवण्यात आली असून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मजुरांचे निघण्याचे स्टेशन, उतरण्याचे स्टेशन अशा सर्व माहितीसह एक अहवाल बनवून सादर करायचा असल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे. त्यानुसार रेल्वे चालवण्यासंदर्भात नियोजन केलं जाईल, असं यात नमूद केलं आहे.
Leave a comment